निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या कारवाईत 53 जण जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. राज्याची राजधानी इंफाळमध्ये दोन युवकांच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जमावावर पोलिसांनी मंगळवारी लाठीमार केला आहे. या घटनेत एका शिक्षकासह 53 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दोन युवकांचे जुलैमध्ये अपहरण करण्यात आले होते. हे दोघेही विद्यार्थी होते आणि त्यांची नावे हेमजीत (20 वर्षे) आणि हिजाम लिनथोइनगांबी (17 वर्षे) अशी होती. या दोघांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात निदर्शने सुरू केली होती.
सुरक्षा दलांनी निदर्शकांना मुख्यमंत्री सचिवालयाच्या दिशेने जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. जखमी निदर्शकांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सीबीआयला सोपविण्यात आली आहे. राज्य सरकार लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सहकार्याने राज्याचे पोलीस विद्यार्थ्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. आरोपींना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी म्हटले आहे.
बेपत्ता विद्यार्थ्यांची दोन छायाचित्रे सोमवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यातील एका छायाचित्रातत कथित स्वरुपात विद्यार्थी दोन शस्त्र हाती घेतलेल्या लोकांसोबत दिसून येत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात विद्यार्थ्यांचे मृतदेह दिसून येत आहेत.
राज्यात 23 सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेटवरील बंदी हटविण्यात आल्यावर विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे समोर आली होती. परंतु अद्याप दोघांचेही मृतदेह हस्तगत झालेले नाहीत. जुलै महिन्यात दोन्ही विद्यार्थी एका दुकानात दिसून आले होते, त्यानंतर त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. तर राज्य सरकारने 27 सप्टेंबर अन् 29 सप्टेंबर रोजी सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
केंद्राच्या निष्क्रीयतेवर टीका
मणिपूरमध्ये मुलेमुली हिंसेत सर्वाधिक शिकार ठरल्या आहेत. मुलामुलींच्या रक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे. मणिपूरमध्ये होत असलेले गुन्हे निशब्द करणार आहेत. तरीही राज्यात गुन्हे घडू दिले जात आहेत. केंद्र सरकारची निष्क्रीयता लाजिरवाणी असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी केली आहे.