विदेश मंत्र्यांची बैठक
वृत्तसंस्था/ केपटाउन
दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्सच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) सदस्य देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद मोठा धोका ठरला आहे. दहशतवादाचे फंडिंग आणि फैलावाच्या विरोधात कठोर पावले उचलली जावीत. दहशतवादाचे समूळ उच्चाटन केले जावे असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
ब्रिक्स देशांच्या बैठकीत भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत बदल घडवून आणण्याची मागणी केली आहे. 20 वर्षांपासून आम्ही बदल करण्याची मागणी करत आहोत, परंतु आमच्या हाती केवळ निराशाच लागली आहे. याचमुळे ब्रिक्स देशांनी अशाप्रकारच्या विषयांमध्ये एकजुटता दाखविणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळण्याच्या मार्गात चीनच सर्वात मोठा अडथळा आहे. चीन हा ब्रिक्सचाही सदस्य आहे. सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला आतापर्यंत चीननेच विरोध केला आहे. सुरक्षा परिषदेचे उर्वरित सर्व स्थायी सदस्य म्हणजेच फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, रशियाचे भारताला समर्थन आहे. परंतु चीनच्या आडकाठीमुळे भारताला आतापर्यंत सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वापासून मुकावे लागले आहे.
ब्रिक्स देशांच्या बैठकीत पाश्चिमात्य देशांच्या दबदब्याच्या विरोधात चर्चा करण्यात आली. पाश्चिमात्यांच्या प्रभुत्वापासून दूर एक नवी जागतिक व्यवस्था प्रस्थापित करण्यावर चर्चा झाली आहे. जग आता बदलत असून जुन्या पद्धतींद्वारे नव्या समस्यांवर उपाय केले जाऊ शकत नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
ब्रिक्स जगाला बहुध्रुवीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार ब्राझीलचे विदेशमंत्री मउरो वियरा यांनी काढले आहेत. या बैटकीत चीनचे उपविदेशमंत्री आणि रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह देखील सामील झाले. सौदी अरेबिया समवेत अनेक देश ब्रिक्समध्ये सामील होऊ इच्छित असल्याचे लावरोव्ह यांनी नमूद केले आहे.