एलॉन मस्क यांच्या टीमची सरकारसोबत भेट : मॅन्युफॅक्चगिं युनिट स्थापन करणार असल्याची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (17 मे) भारतीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कंपनीने भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी उत्पादन कारखाना स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत सरकार, टेस्ला किंवा एलॉन मस्ककडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या अगोदरही गेल्या वर्षी टेस्लाने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकली नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असताना टेस्ला यांची भारत सरकारसोबतची बैठक अशा वेळी झाल्याने टेस्लाला गती मिळणार असल्याचेही अभ्यासकांचे मत आहे. टेस्लाने सरकारला पूर्णपणे असेंबल्ड कारवरील आयात शुल्क 100 टक्के वरून 40 टक्केपर्यंत कमी करण्यास सांगितले होते. परंतु सरकारने स्पष्टीकरण देताना इतर देशांमधून आयात केलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क सूट देण्याचा किंवा कमी करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही म्हटले आहे. सरकारने म्हटले होते की जर टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले तर ते आयातीवर सवलत देण्याचा विचार करेल. पण एलॉन मस्कची इच्छा होती की या गाड्या आधी भारतात विकल्या जाव्यात, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाचा विचार करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
प्रकल्पाचा विचार केला जाईल
27 मे 2022 रोजी, एलॉन मस्कनेही एका ट्विटमध्ये उत्तर दिले की, ‘टेस्ला अशा ठिकाणी उत्पादन प्रकल्प उभारणार नाही जिथे त्याला कार विकण्याची आणि सेवा देण्याची पूर्वपरवानगी नाही.’ एलॉन मस्कचे उत्तर आले जेव्हा ट्विटर युजर मधु सुधन व्ही ने विचारले – टेस्ला भविष्यात भारतात प्रकल्प बांधत आहे का?’
कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प चीनमधून भारतात
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे विविध कंपन्या चीनमधून भारतात उत्पादन युनिट हलवत आहेत. भू-राजकीय तणाव आणि कोरोना महामारीनंतर अॅपलसह इतर अमेरिकन टेक कंपन्या दिग्गज चीनच्या बाहेरही त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी काम करत आहेत.
भारताकडे कल दर्शवणारे मुद्दे :
- मस्कने अलीकडेच सांगितले की, त्याला भारतीय पदार्थ आवडतात, विशेषत: नानसोबत बटर चिकन
- गेल्या महिन्यात मस्क यांनी पंतप्रधान मोदींना ट्विटरवर फॉलो केल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला होता.