वृत्तसंस्था/ सुरत
2022 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या टेबल टेनिस या क्रीडाप्रकारात यजमान गुजरातने पुरुष एकेरीचे तर पश्चिम बंगालने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकाविले.
पुरुष एकेरीच्या शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातच्या हरमित देसाईने पश्चिम बंगालच्या सौम्यजित घोषचा 4-0 अशा गेम्समध्ये एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या सुतीर्था मुखर्जीने श्रीजा अकुलाचा 4-1 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस या क्रीडा प्रकाराचा समारोप शनिवारी येथे झाला. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय संघातील हरमित देसाईच्या कामगिरीत सातत्य दिसून आले. त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीत टॉप सिडेड साथियानचा पराभव केला. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने सौम्यजित घोषला एकतर्फी पराभूत केले.
पश्चिम बंगालच्या सुतीर्थ मुखर्जीचे या स्पर्धेत एकूण तीन सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्यामध्ये सांघिक प्रकाराचा समावेश आहे. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारामध्ये पश्चिम बंगालने आघाडीचे स्थान मिळविताना चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 8 पदकांची कमाई केली आहे. गुजरातने दुसरे स्थान मिळविले आहे. हरमित देसाईने या स्पर्धेत एकूण 2 सुवर्णपदके पटकाविली आहेत. त्यामध्ये सांघिक प्रकाराचा समावेश आहे. गुजरातने एकूण 6 पदकांची कमाई केली आहे. गुजरातच्या मनुष शहा आणि क्रिती विका यांनी यजमान गुजरातला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एक रौप्य आणि 4 कास्य पदकांसह तिसरे स्थान मिळविले आहे. महिलांच्या दुहेरीचे सुवर्णपदक बंगालच्या सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी पटकाविले. पुरुष दुहेरीची सुवर्णपदक पश्चिम बंगालच्या रोनित भांजा आणि जीत चंद्रा यांनी घेतले आहे. मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक गुजरातच्या मनुषा शहा आणि रॉय यांनी जिंकले आहे.