हुपरी प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारने पोकळ आश्वासने व बोलघेवड्या योजनांच्या नावाखाली सामान्य माणसाची पुरती दिशाभूल केली आहे. मोठमोठ्या घोषणा आणि त्यात पोकळ गाभा हेच या सरकारांचे उद्दिष्ट राहिले असून जनमानसांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे जनतेचे रोजचे जगणे मुश्कील झाले आहे असे मत शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. हुपरी ता.हातकणंगले येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित होऊ द्या चर्चा अभियानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.
आश्र्वासित केल्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख आले का? घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का? मोदींनी मोठे मोठे कार्यक्रम करून जाहीर केलेल्या योजना खरोखर सामान्य जनतेमध्ये पोहोचल्या का? महागाई आटोक्यात आली का? आजच सरकारने व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची वाढ करत सणासुदीच्या तोंडावर आपल्याला भेट दिली आहे त्यामुळे अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह करत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सरकारचा बोलघेवडेपणा उघड केला. त्याअनुषंगाने सामान्य जनतेमध्ये असलेला असंतोष जागृत करून जनतेसमोर सरकारच्या पोकळपणाचा पर्दाफाश करण्याचा उद्देशाने होऊ द्या चर्चा अभियान आखले असल्याची माहितीही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली.
हवेतल्या घोषणांनी भावनिक राजकारण करून सत्तेवर आलेल्या सरकारने नुसतच इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचे लक्ष ठेवले आहे.अरबी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा भावनिक कार्यक्रम करून आजही त्याबद्दल सरकार ब्र काढायला तयार नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, खते- बियाणे यांची सर्वत्र वानवा आहे. जीएसटी च्या नावाखाली उद्योग धंदे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सरकारला जनतेच्या साक्षीने जाब विचारण्यासाठी आपण इथे उपस्थित असल्याची भावना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी मांडली.
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर,उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,तालुकाप्रमुख बाजीराव पाटील,युवासेना जिल्हा अधिकारी स्वप्नील मगदूम, भरत देसाई,राजेंद्र पाटील,रघुनाथ नलवडे,मीना जाधव,विनायक विभूते,उषाताई चौगुले, बाळासाहेब मुधाळे,पूनम पाटील,शिवाजी मुरलीधर जाधव,अर्जुन मुरलीधर जाधव,अरुण गायकवाड, भरत मेथे ,शामराव पाटील, महेश कोरवी, संदीप भंडारे, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.