शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. महाविकास आघाडीतील या महत्वाच्या नेत्यांदरम्यान सुमारे दीड तास चर्चा झाली असून या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा उलगडा अद्याप झाली नाही. गेल्या शरद पवारांनी अदानी समूहाला अभय देऊन त्याच्या समर्थनार्थ अमेरिकन रिसर्च संस्था हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले होते.
गेले काही दिवस महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या. राहूल गांधी यांनी विदा सावरकर यांच्यावर केलेल्या टिप्पणी, ठाकरे गटाचा अदानी समुहावर केलेला आरोप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून हे वाद पेटल्याचे बोलले जात आहेत. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नसून सर्व काही अलबेल असल्याचे दाखवले जात आहे.
भाजपनेही हि संधी न सोडता महाविकास आघाडीच्या एकजूटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून हा मुद्दा चांगलाच चर्चेत ठेवला. या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर मात्र नेत्यांनी मौन धारण केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पण खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होऊन भविष्यातील दिशा ठरवण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी अगदी सकारात्मक चर्चा झाली असे त्यांनी म्हटले आहे.