पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतवर भारताची मदार : पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिरागही सहभागी होणार
वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड सुपर 500 पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत. भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांच्यावर भारताची धुरा असणार आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेच्या प्रारंभी तिने शानदार सुरुवात करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती पण इंडोनेशियाची युवा खेळाडू ग्रिगोरिया मारिस्काकडून तिला हार पत्करावी लागली. आजपासून सुरु होणाऱ्या थायलंड ओपन स्पर्धेत मात्र तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान, सिंधूची सलामीची लढत कॅनडाच्या मिशेली ली हिच्याविरुद्ध होणार आहे. सायना नेहवालने मात्र या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पुरुष एकेरीत के.श्रीकांत, लक्ष्य सेन यांच्यावर भारताची प्रामुख्याने मदार असणार आहे. सिंधूप्रमाणे मलेशियन मास्टर्स स्पर्धेत श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. अलीकडील काळात श्रीकांतला एकाही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शानदार कामगिरी करता आलेली नाही. यामुळे या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. श्रीकांतचा सलामीचा सामना चीनच्या वेंग यांगविरुद्ध होणार आहे. यांगने गत आठवड्यात मलेशियन मास्टर्सची अंतिम फेरी गाठली होती. यामुळे सलामीच्या सामन्यात श्रीकांतचा कस लागणार आहे. याशिवाय, युवा खेळाडू लक्ष्य सेनची सलामीची लढत चिनी तैपईच्या वांग वेईविरुद्ध तर प्रियांशू राजावतचा सामना मलेशियाच्या के एन योंगशी होणार आहे.
पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिरागवर मदार
अलीकडील काळात पुरुष दुहेरीत शानदार कामगिरी करणारी भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज-चिराग शेट्टी या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मलेशियन मास्टर्स स्पर्धेतून या जोडीने माघार घेतली होती. या जोडीचा सलामीचा सामना फ्रान्सच्या लुकास कोर्वी-रोनान लेबर यांच्याविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या स्टार जोडीने 58 वर्षानंतर आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला जेतेपद मिळवून दिले. अर्थात, मागील दोन-तीन वर्षातील त्यांचे परिश्रम यामागे आहे. यामुळे थायलंड ओपन स्पर्धेतही या जोडीकडून जेतेपदाची आशा असणार आहे.