दुहेरी गटात सोलापूरच्या आकृतीच्या साथीने पटकावले विजेतेपद ; इंडोनेशियाच्या खेळाडूंना चारली पराभवाची धुळ
प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Sport News : थायलंडमधील नॉन्थाबुरी येथे झालेल्या आयटीएफ आशियाई 14 वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवने (कोल्हापूर) दुहेरी गटात विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐश्वर्याने आकृती सोनकुसरे (सोलापूर) हिच्या साथीने मिश्का गोएनाडी (इंडोनेशिया) आणि अंजली जुनार्तो (इंडोनेशिया) यांच्या जोडीचा 6-3 व 6-3 अशा सरळ सेटने पराभव करत विजेतेपद पटकावले.ऐश्वर्या व आकृती यांच्या जोडीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिले विजेतेपद ठरले आहे.
इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 12 देशातील टेनिसपटूंच्या जोड्या सहभागी होत्या. आशिया खंडात भारतीय संघाच्या ऐश्वर्या व आकृती यांच्या जोडीचे रँकीग अव्वल असल्याने त्यांना स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेच्या पहिला सामन्यासाठी पुढे चाली दिली होती. त्यामुळे त्यांची स्पर्धेतील सुरुवात प्री-क्वार्टर फायनल या सामन्यापासून झाली. या सामन्यात ऐश्वर्या व आकृती यांच्या जोडीने साबा (इराण) आणि यास्मान (इराण) यांच्या जोडीला 6-4 व 6-1 अशा सरळसेटने जिंकून उपांत्यपूर्व फेरी प्रवेश केला. या फेरीतही ऐश्वर्या जाधव व आकृती यांच्या जोडीने शानदार खेळी करत एच. चॅन आणि कॅमेरॉन येउंग (हाँगकाँग) यांच्या जोडीला 6-2 व 6-3 सरळसेटने हरवून उपांत्य फेरी गाठली.
कोल्हापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यजमान तारिता व सकुर ओंगताना (दोघी थायलंड) यांच्या जोडीशी ऐश्वर्या व आकृती यांच्या जोडीचा उपांत्य सामना झाला. मात्र या सामन्यातही ऐश्वर्या व आकृतीने अपेक्षेप्रमाणे खेळ करत तारिता व सकुर यांच्या जोडीचा 6-1 व 6-2 अशा सरळसेटने पराभव करत स्पर्धा विजेतेपदाच्या लढाईसाठी अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना खेळताना ऐश्वर्या व आकृतीने वेगवान सर्व्हिस करत तुल्यबळ अशा मिश्का गोएनाडी व अंजली यांच्या जोडीला बॅकपटूवरुन खेळण्यास भाग पडाले. इतकेच नव्हे तर संपूर्ण सामन्यात मिश्का व अंजली यांच्या जोडीच्या पहिल्या व दुसऱ्या सेटमधील प्रत्येकी 2 सर्व्हिस ऐश्वर्या व आकृतीने ब्रेक केल्या. त्यामुळेच त्यांचा मिश्का व अंजली यांच्या जोडीवर 6-3 व 6-3 अशा सरळसेटने विजय होऊन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा झाला. ऐश्वर्याला कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉन टेनिस असेसिएशन व अर्शद देसाई टेनिस ऍपॅडमीचे आणि आकृतीला सोलापूर डिस्ट्रीक्ट लॉन टेनिस असोसिएशनचे मार्गदर्शन लाभत आहे.