प्रतिनिधी /म्हापसा
पुणे पोलिसांना हवा असलेला फसवणूक प्रकरणातील ठकसेन हर्षद सतीश कोकीळ गोव्यात लपला असता कळंगूट पोलिसांनी त्याला शोधून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केला. 3 कोटी 70 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पुणे पोलिस त्याच्या मागावर होते.
पुणे मार्केट यार्ड येथे पुणे पालिकेची ऑक्यूपन्सी सर्टीफिकेट, कागदपत्रे, पॅनकार्ड, आधार कार्ड दाखवून त्याने 3 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक केली होती. एका कळंगूट येथील गेस्ट हाऊसमध्ये तो लपून बसला होता. आपले बनावट नाव संदीप योगेश पाटील असे नाव धारण करून तो येथे राहत होता. निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल अमीर गरड यांनी ही कारवाई केली.