सांबरा कुस्ती मैदान : नागराज बशीडोणीचा प्रेक्षणीय विजय, 20 हजार कुस्तीशौकिनांची उपस्थिती
युवराज पाटील/उमेश मजुकर/सांबरा/बेळगाव
सांबरा येथे सांबरा कुस्तीगीर कमिटी व सांबरा ग्रामस्थ यांच्यावतीने भव्य कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने संदेश ठाकुर सांगली याचा 18 व्या मिनिटाला एकलांगी डावावर तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती नागराज बशीडोणीने भूषण पवार नासिक याचा एकलांगी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवून उपस्थित 20 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
सांबरा येथे विमानतळ लगत कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व मध्यप्रदेश केसरी संदेश ठाकुर सांगली ही कुस्ती गंगण्णा कोलूर, शिवराज जाधव, राष्ट्रकुल पदक विजेते शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर व सांबरा कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला संदेश ठाकुरने दुहेरी पट काढून कार्तिक काटेला खाली घेत घिस्सा मारून चित करण्याचा प्रयत्न केला पण कार्तिकने त्यातून सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून संदेशला खाली घेऊन आकडी लावीत एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न केला पण संदेशने चलाखीने त्यातून सुटका करून घेतली. 16 व्या मिनिटाला कार्तिकने पायाला टाच मारून संदेश ठाकुरवर कब्जा मिळवून पायाला आकडी लावत एकलांगी भरून संदेश ठाकुरला चारीमुंड्या चित करून उपस्थित शौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अॅड् रमेश पाटील, नागोजी चौगुले, पुंडलिक जोई यांच्या हस्ते कर्नाटक केसरी नागराज बशीडोणी व भूषण पवार नासिक ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत नागराजने तिसऱ्या मिनिटाला एक दुहेरी पट काढून भूषणला खाली घेत एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण भूषणने त्यातून सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला भूषणने हप्ते भरून बशीडोणीला खाली घेत चित करण्याचा प्रयत्न केला पण अनुभवी नागराजने त्यातून सुटका करून घेत भूषणला चाट मारून खाली घेत एकलांगी भरून चित करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिराजदार व शुभम कोळेकर ही कुस्ती डाव प्रतिडावाने रंगली. शेवटी ही कुस्ती गुणावरती निकाल करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण गुणावरतीही कुस्ती न झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार कारवे कंग्राळी याने सुनील कवटेपिरान याचा गुणावरती विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कंग्राळी व विशाल शेळके यांच्यात डाव प्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने प्रताप ठाकुरचा घुटणा डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने पवन चिकदिनकोप्पचा एकचाक डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्ती कार्तिक इंगळगीने गुद्याप्पा दावणगेरीचा डाक डावावरती चित केले. नवव्या क्रमांकाच्या मेंढ्याच्या कुस्ती प्रवीण निलजीने महादेव दऱ्याण्णावरचा डंकी डावावरती चित करून मेंढ्याचे बक्षीस पटकावले. दहाव्या क्रमांकाच्या कुस्ती सुशांत कंग्राळीने हणमंत इंगळगीचा एकचाक डावावर विजय मिळवला. संकल्प कंग्राळीने रुपेश जाधव कोल्हापूरचा लपेट डावावरती विजय मिळवला. त्याचप्रमाणे रोहित कवटीपिरान, पंकज चापगाव, चिन्मय येळ्ळूर, वैभव सांबरा, ओम कंग्राळी, राहुल किणये, ओमकार सावगाव, मंथन सांबरा, हर्षवर्धन कंग्राळी, परशराम चलवेनहट्टी, रोहन कडोली, लक्ष्मण मण्णीकेरी, महांतेश संतिबस्तवाड, नंदकुमार संतिबस्तवाड, भूमीपूत्र मुतगा, ओमकार संतिबस्तवाड, अभी मुतगा, केशव सांबरा, श्रीकांत शिनोळी, केशव मुतगा, नितीन मुतगा, श्रीनंद निलजी, अक्षय कडोली, निरंजन कडोली, सिद्धार्थ कुरिहाळ, पृथ्वीराज अवचारहट्टी, शिवप्रसाद मुत्नाळ, प्रज्वल मजगाव, विनय सुलधाळ, संभव शिनोळी, स्वयंम माळवी, सन्वित पवार यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय संपादन केला. मेंढ्याच्या कुस्त्यातून महेश तीर्थकुंडयेने सुरज कडोलीचा पराभव करून तर पार्थ तिर्थकुंडयेने प्रणव खादरवाडीचा पराभव करून मेंढ्याचे बक्षीस मिळवले. आखाड्याचे पंच म्हणून शिवाजी चिंगळे, नवीन मुतगे, शंकर पाटील, काशिनाथ पाटील, कृष्णा पाटील, भाऊ पाटील, मारुती तुळजाई, राजू कडोली, प्रशांत पाटील, परशराम सावगाव, मनोहर मुतगेकर, पिराजी मुचंडीकर, बाळासाहेब सुतार, परशराम अवचारहट्टी, कृष्णा कणबर्गी, गणपत बनोशी आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे व यल्लाप्पा हरजी यांनी केले.
क्षणचित्रे…
- सांबरा कुस्तीगीर संघटनेने कुस्ती शौकिनांना बसण्यासाठी भव्य गॅलरी उभारली होती.
- आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुस्ती मैदानाला हजेरी लावून बेंगळूरला प्रयाण केले.
- सांबरा येथे 1986 ला शेवटचे मैदान झाले होते. त्यानंतर नूतन संघटनेने मैदानाला संजीवनी दिल्याने कुस्ती शौकिनांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
- मैदानात मेंढ्यासाठी चार कुस्तींचे आयोजन करण्यात आले होते. तर गद्यासाठी एक कुस्ती झाली.
- पुढील वर्षी लक्ष्मी यात्रेनिमित्त सांबरा येथे आंतरराष्ट्रीय स्तरीय मैदान आयोजन करण्याचा संकल्प, त्याला कुस्ती शौकीन व देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.