वृत्तसंस्था/ लंडन
भारतामध्ये सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात लंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याला ‘टाईम आऊट’चा बळी ठरविला. पंचांचा हा निर्णय योग्य असल्याचे एमसीसीतर्फे सांगण्यात आले.
या सामन्यात मॅथ्यूज ज्या पद्धतीने बाद झाला त्याबद्दल खरोखरच दुर्दैव म्हणावे लागले. लंकेचा समरविक्रमा बाद झाल्यानंतर मॅथ्यूजचा फलंदाजीसाठी क्रमांक होता. नियमानुसार 1 गडी बाद झाल्यानंतर दुसरा नवा फलंदाज केवळ दोन मिनिटांच्या कालावधीत मैदानात येणे गरजेचे आहे. पण मॅथ्यूज मैदानात आला त्यानंतर त्याला आपल्या हेल्मेटची पट्टी मोडल्याचे आढळून आले. त्याने नव्या हेल्मेटसाठी पॅव्हेलियनकडे मागणी केली. पण मॅथ्यूजला या अल्पशा कालावधीत दुसरी हेल्मेट मिळू शकली नाही. त्यामुळे पंचांनी त्याला टाईम आऊट नियमानुसार बाद ठरविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे इरासमुस आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानातील पंच म्हणून कार्यरत होते. या सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळ संपल्यानंतर पंचांशी हस्तांदोलन करणे टाळले.