केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
शैक्षणिक मेळाव्या सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासंबंधी विविध संधी या माध्यमातून उपलब्ध होतील, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
पणजीत गोवा करमणूक संस्थेच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शैक्षणिक मेळाव्याचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री. नाईक बोलत होते. स्टडी ग्लोबल या संस्थेतर्फे या शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना श्री. नाईक यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाच्या माध्यमातून गोव्यातील विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठांची माहिती मिळेल, व त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल. विदेशात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना गोवा सरकारतर्फे व्याजरहित कर्ज पुरवठा करण्यात येतो, असे नाईक यांनी सांगितले.
शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकारने नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. त्यामुळे आपली शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी विविध संधी या माध्यमातून उपलब्ध होतील, असे नाईक पुढे म्हणाले.
कोविड महामारी काळात शैक्षणिक क्षेत्राने ऑनलाईन शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचेही श्री. नाईक यांनी कौतुक केले. आपले शैक्षणिक क्षेत्र जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी आपल्याला अध्ययन- अध्यापन प्रक्रियेची निरंतर पुनर्व्याख्या आणि पुनर्रचना करावी लागेल, असे नाईक यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा सहभाग
अंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी (यूके), डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी (यूके), बर्लिन स्कूल ऑफ बिझनेस अँड इनोव्हेशन (जर्मनी), एक्सेलिया ला रोशेल (फ्रान्स), एमएएचई (दुबई), हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (स्वित्झर्लंड), गॅनॉन युनिव्हर्सिटी (यूएसए), बीएचएमएस (स्वित्झर्लंड), युनिव्हर्सिटी ऑफ फिन्डले (यूएसए), युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थहॅम्प्टन (यूके), युनिव्हर्सिटी ऑफ रोहॅम्प्टन (यूके), बीपीपी युनिव्हर्सिटी (यूके), युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोना या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी या शैक्षणिक मेळाव्यात सहभाग घेतला.
दरम्यान, व्याजरहित शैक्षणिक कर्ज योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी http://www.goa.gov.in/wp-content/uploads/2020/12/intrest-free-education-loan-scheme-pdf.या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.