राष्ट्रीय रॉकेट मेकिंग मिशन परीक्षेत 17 वा
प्रतिनिधी/ खेड
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय रॉकेट मेकिंग मिशन परीक्षेत खेड तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील इयत्ता पाचवीच्या आराध्य मेहता याने 17 वा क्रमांक पटकावल्याने त्याची राष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष पिको उपग्रह बनवण्यासाठी निवड झाली आहे. त्याला सर्वांत लहान बालवैज्ञानिक म्हणून गौरवण्यात आले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 हा महत्वाकांक्षी प्रकल्प माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठीचे एक पाऊल आहे. 2020-21मध्ये केलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पेलोड क्युब्ज चॅलेंज प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प
हाऊस ऑफ कलाम येथील चालविल्या जाणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनकडून व स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्याद्वारा राबवला जात आहे. प्रशालेच्या आराध्य याने या प्रकल्पात सहभागी होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या रॉकेट मेकिंग मिशन निवड चाचणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर 17 वा क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष पिको उपग्रह बनवण्यासाठी निवड झाली आहे. त्याला सर्वात लहान बालवैज्ञानिक म्हणून गौरवण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या यशामुळे त्याला चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष वापरात येणारे रॉकेट बनवण्याची संधी मिळाली आहे. या रॉकेटचे वजन 22.5 केजी असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्यानंतर रॉकेटचे वजन 45 ते 60 केजी असेल. या रॉकेट 19 फेब्रुवारी 2023 रोजी तामिळनाडूमधील कांचीपुरमजवळील पट्टीपूर येथून अवकाशात सोडले जाईल. हे रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळवण्यात आल्या आहेत.
रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने परत जमिनीवर लॅण्ड करेल आणि पुढील मिशनसाठी परत वापरता येईल, असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी 150 पिको उपग्रहासोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने 19 रोजी हा भारतीय विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम आशिया विक्रम इंडिया विक्रम, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होणार आहेत.
आराध्य याच्या यशामुळे प्रशालेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गौरवले जात आहे. संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आराध्यचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.