एपीएमसीमध्ये बाजार बंद : तरीही कंग्राळी खुर्द येथील खुल्या जागेत सुरू : मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अधिकारीही हतबल
अगसगे/ वार्ताहर
सध्या जिल्ह्यात सावकाशपणे ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत असला तरी शेतकऱ्यांमध्ये अजूनही म्हणावी तशी जागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जनावरांना मोठा धोका निर्माण होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पशुसंगोपन खात्याने बाजार भरविण्यास विरोध दर्शविला आहे. मात्र दुसरीकडे ‘लम्पी’ची धोका न बाळगता शेतकऱ्यांनी एपीएमसीमध्ये निर्बंध घातल्याने तो बाजार आता कंग्राळी खुर्द येथील खुल्या जागेत भरविण्यात आला. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात ‘लम्पी’ विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हळुहळू वाढू लागला आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे लागण झालेल्या जनावरांना लम्पीतून मुक्त करण्याचे आवाहन पशुसंगोपन समोर आहे. परिणामी धोका वाढू नये यासाठी जनावरांच्या बाजारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार न करता बाजार भरविण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही आता गोची झाली आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘लम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव सध्या तालुक्यात अधिक प्रमाणात नसला तरी याची काळजी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी जर याकडे दुर्लक्ष केले तर याचा फटका त्यांनाच बसणार आहे. त्यामुळे रोग नियंत्रणात येईपर्यंत बाजार भरविण्याकडे दुर्लक्ष करावे, असेही सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या रोगाने 25 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांनीच जर अशा प्रकारे निष्काळजीपणा दाखविला तर अधिकारीही काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
हा रोग केवळ गो-वर्गीय जनावरांना होत असला तरी इतर जनावरांची काळजी घेणेही तितकेच जरुरीचे आहे. सध्या जिल्ह्यातील गोकाक, निपाणी, कागवाड, अथणी, हुक्केरी आदी तालुक्यांमध्ये ‘लम्पी’ बाधित जनावरांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये बेळगावचा समावेश नसला तरी तो फैलावण्यास उशीर लागणार नाही. त्यामुळे आताच काळजी घेण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे व रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याकडून करण्यात येत आहे.
आठवडी बाजार बंद करा
प्रशासनाने जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा रोगाची तीव्रता कमी असली तरी तो फैलावण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अद्याप एकही जनावर दगावले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून आठवडी बाजारही बंद करावेत, असे आवाहन पशुसंगोपन खात्याकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाचा आदेश धुडकावून भरविला बाजार
प्रशासनाचा आदेश धुडकावून शनिवारी एपीएमसी बाजारात जनावरांचा बाजर भरविण्यात आला. त्यामुळे दलाल, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये ‘लम्पी’ विषयी भीती नसल्याचेही दिसत आहे. मात्र या बाजारातून एखादे बाधित जनावर संपर्कात आल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. ‘लम्पी’ हा संसर्गजन्य रोग असल्याने बाधित जनावरांपासून इतर जनावरांकडे तातडीने फैलावतो.