प्रतिनिधी / खेड
खाडीपट्टा विभागातील बहिरवली येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. मुंबई-पन्हाळजे एसटी बसखाली डुक्कर मारण्यासाठी वापरात येणारा बॉम्ब फुटल्याने टायर फुटून ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मात्र नेमका टायर फुटला की बॉम्ब फुटला? या बाबत तर्कवितर्क लढवण्यात येत असून सायंकाळी उशिरापर्यंत नेमका उलगडा होऊ शकला नाही. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी येथील पोलिसांकडे केली असल्याचे समजते. बस चालक युसूफ दाऊदसाब मुंडके व वाहक मनोज तुकाराम जडय़ाळ हे एमएच 14 बीटी 2559 क्रमांकाची एसटी बस घेऊन मुंबई येथून खेडहून पन्हाळजे येथे जात असताना बहिरवली नं. 1 नजीक डुक्कराला मारण्यासाठी वापरण्यात येणारा बॉम्ब टायरखाली येऊन अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटाने बसमधील प्रवासी भयभीत झाले. याचवेळी पन्हाळजेहून कर्जी येथे शाळेतील मुलांना घेवून येणारी खासगी बसदेखील येत होती. याचदरम्यान झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली. मात्र मोठी दुर्घटना टळल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
या घटनेचे वृत्त कळताच नजीकचे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी उशिरापर्यंत घडलेल्या घटनेचीच सगळीकडे चर्चा सुरू होती. डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारा बॉम्बस्फोट झाल्याची कुजबुज ग्रामस्थांमध्ये सुरू होती. या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करून दोषींवर कारवाईची मागणी सरपंच विजय जाधव व पोलीस पाटील डेरवणकर तसेच ग्रामस्थांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेवून योग्य ती चौकशी करत कठोर कारवाई करण्याची मागणीही सरपंच विजय जाधव यांनी केली आहे.