पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने “बेकायदेशीर” घोषित केले आहे. त्यामुळे पाकिस्तान तहरीक- ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख असलेल्या ईम्रान खान यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ईम्रान खान यांना न्यायालयात हजर केल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार देशाच्या माजी पंतप्रधानांना कडक सुरक्षा व्यवस्थेखाली न्यायालयात आणण्यात आले होते.
पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अथर मिनाल्ला यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंडपीठाने खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून ज्या प्रकारे ताब्यात घेतले त्यावर संताप व्यक्त केला. तसेच ही अटक बेकायदेशीर असल्याचेही मत सर्वोच्च न्यायमूर्ती व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने इम्रान खान यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयात दिलेल्या जबानीत आपले इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून “अपहरण” करण्यात येऊन काठ्यांनी मारहाण केली असल्याचे सांगितले. सरन्यायाधिश बांदियाल यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाच्याच आवारातून अटक करणे हे देशाच्या न्यायिक व्यवस्थेला कलंक असल्याचे म्हटले आहे.