प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र एकामागोमाग एक लिलाव प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी टिळकवाडी येथील भाजी मार्केटच्या गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत कोणीही सहभागी झाले नाही. त्यामुळे महापालिकेला भाडेकरू मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महात्मा फुले भाजी मार्केटमधील 58 व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी गुरुवारी लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र या लिलाव प्रक्रियेत कोणीच सहभाग घेतला नाही. त्यापाठोपाठ टिळकवाडीतील नव्या भाजी मार्केटसाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. पण आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत एकाही नागरिकाने सहभाग घेतला नाही. त्यामुळे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली लिलाव प्रक्रियादेखील बारगळली आहे.
न्यायालयीन वादामुळे लिलावाकडे पाठ
महसूल उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करीत आहे. पण प्रत्येक वेळी अपयश येत आहे. हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी तीन ते चार वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. पण महापालिकेच्या नशिबी प्रत्येक वेळी अपयश आले आहे. न्यायालयीन वादामुळे भाडेकरूंनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविली असल्याने मनपाला भाडेकरू मिळणे कठीण बनले आहे.
अनगोळ नाका, खासबाग, नवबागवेस येथील गाळय़ांचा आज लिलाव
संकुलातील गाळय़ांना बोली लागली नसल्याने नुकसान होत आहे. बोली प्रक्रियेत नागरिक सहभागी होत नसल्याने अनामत रक्कम कपात करून लिलाव आयोजित करण्यात आला होता. तरीदेखील कोणी सहभागी न झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने 254 व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली आहे. यापैकी 70 गाळय़ांना भाडेकरू मिळाले नाहीत. आतापर्यंत झालेल्या लिलावात केवळ 4 गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत. शनिवार दि. 15 रोजी अनगोळ नाका येथील व खासबाग, नवबागवेस येथील गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या गाळय़ांना तरी भाडेकरू मिळणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.