हे जग अजब प्रकारच्या माणसांनी भरलेले आहे. अनेक लोक स्वत:च्या लाभासाठी अशी काही शक्कल लढवितात, की त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे की त्यांनी बुद्धीचा चुकीचा उपयोग केला, यासाठी त्यांना दूषणे द्यावीत, असा संभ्रम आपल्या मनात निर्माण होतो. अमेरिकेत नेपोलियन गोंझालेज नामक एका व्यक्तीने स्वत:च्या स्वार्थासाठी असे एक कृत्य केले आहे, आज त्याची जगभरात चर्चा होत आहे.
अमेरिकेसह युरोपमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये याला प्रसिद्धी मिळाली आहे. या नेपोलियन गोंझालेज याच्या भावाचा मृत्यू झाला. त्याने आपल्या भावाची ओळखपत्रे आणि इतर ओळख पटविण्याची चिन्हे आपल्या ताब्यात घेतली. त्या आधारे त्याने बनावट पासपोर्ट काढून घेतला. तसेच सरकारच्या सवलतींचा लाभ उठविण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि ओळखपत्रेही तयार केली. अशा प्रकारे त्याने आपला भाऊ जिंवतच असल्याचे भासवत त्याच्या नावाने सरकारी योजनांचा लाभ उठविला. हा प्रकार त्याने थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 58 वर्षे घेतला. त्याच्या भावाचा मृत्यू 1939 मध्ये झाला होता. आज गोंझालेज 86 वर्षांचा आहे. मृत झालेल्या भावाला कागदोपत्री जिंवत ठेवून त्याने केलेला हा अपराध काही दिवसांपूर्वीच उघड झाल्याने अमेरिकेसारख्या आधुनिक आणि तत्पर देशातील प्रशासकीय दुर्लक्षावरही टीका केली जात आहे. गोंझालेज याच्या भावाचे भूत त्याने उभे केले आणि इतकी वर्षे लाभ उठविला, असे उपहासाने बोलले जात आहे.