प्रतिनिधी /पेडणे
नईबाग पेडणे येथील पुलाखाली मंगळवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. पेडणे पोलिसांना यासंबंधीची माहिती मिळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पहाणी करुन पंचानामा केला.
मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवचिकित्सा करण्यासाठी पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख रात्री उशिरा पर्यंत पटलेली नाही. तसेच मृतदेहावर कोणत्याही खूणा तसेच इजा नसल्याचे उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी सांगितले.
सदर मृत व्यक्ती ही सिंधुदुर्गातील असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याचे वय अंदाजे 60 वर्षे आहे. सदर व्यक्ती ही नईबाग परिसरात गेले दोन दिवस फिरत होती अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पेडणे पोलिसांनी याबाबत सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील पोलिसांना माहिती दिली असून अजूनपर्यंत मृतदेह ओळखण्यासाठी कोणी आले नसाल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. सदर व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याबाबत चर्चा असून पेडणे पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.