प्रतिनिधी/ कराड
आगाशिवनगर येथील अभिनव कॉलनीत राहात असलेला युवक कोयना नदीकडेला दुचाकी सोडून बेपत्ता झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मित्रपरिवारासह नातेवाईक, पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह आगाशिवनगरला कोयना नदीपात्रात आढळून आला.
सुनील सतीश कसबे (वय 23 रा. अभिनव कॉलनी, आगाशिवनगर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कसबे हा डेकोरेशनचा व्यवसाय मित्रांसह करत होता. कुटुंबासह तो अभिनव कॉलनीत राहात होता. शनिवारी पहाटे चार वाजता तो दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. तो परत न आल्याने सकाळी नातेवाईकांसह मित्रांनी त्याचा शोध घेतला.
दुचाकीसह चिठ्ठी सापडल्याने संशय बळावला
सुनील कसबे याने बेपत्ता होण्यापूर्वी घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीतील मजकुरावरून तपास सुरू असतानाच त्याची दुचाकी आगाशिवनगरला जाधववस्तीपासून खाली नदीपात्रालगत आढळली. पोलिसांनी तांत्रिकदृष्टीने त्याचा शोध सुरू केला तर मित्रपरिवाराने नदीकाठासह परिसरातील सर्व शेती, डोंगर पिंजून काढत त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. सुनील नेमका कोणत्या कारणाने बेपत्ता झाला आहे याची चौकशी पोलीस करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गंभीरपणे प्रकरण हाताळत तांत्रिक मुद्यांसह चौकशीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरिक्षक राहुल वरूटे, महिला पोलीस रेखा देशपांडे, पोलीस कर्मचारी भोसले या तपासात गुंतले होते.
नदीपात्रात मृतदेह आढळला
सुनील कसबे याचा शोध सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आगाशिवनगर येथे कोयना नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली. सुनीलचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सुनीलच्या मृत्यूने कुटुंबासह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.