नायजेरियात लग्नाची विचित्र प्रथा
लग्नगाठ ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठी घटना असते. यामध्ये दोन व्यक्ती जीवनाच्या बंधनात बांधल्या जातात. प्रत्येक धर्मातील लोकांचे लग्नाशी संबंधित वेगवेगळे नियम असतात. या प्रथा त्यांच्या समाजात शतकानुशतके पाळल्या जात आहेत. आपल्या देशातही लग्नाशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक देशात ते वेगवेगळे आहेत. काही नियम इतके विचित्र असतात की त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर आश्चर्यचकित व्हायला होते.
नायजेरियातील लग्नाशी संबंधित काही चालीरिती बऱ्याच चित्रविचिक्ष आहेत. सध्या तेथील प्रथेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नायजेरियामध्ये लग्नादरम्यान नववधू नटून-थटून तयार झाल्यानंतर तिच्या भावी पतीकडे येत असताना तिला हसण्यास मनाई आहे. ती अत्यंत गंभीर चेहऱ्याने येऊन उभी राहते. त्यानंतर तिला हसवण्यासाठी नवऱ्याकडून प्रयत्न केले जातात. तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी नवरदेवाला नोटांची उधळणही करावी लागते. जेव्हा नववधूला वाटते की इतके पैसे पुरेसे आहेत तेव्हा ती हसते. यानंतर नवरा पैसे उडवणे बंद केल्यानंतर विवाहसोहळ्यातील पुढील रिवाज पार पडतात.
या प्रथेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक नटलेली नववधू लग्नात वराच्या जवळ उभी असल्याचे दिसून येते. तसेच वराच्या बाजूचे अनेक लोक तिच्या आजूबाजूला उभे असून ते तिच्यावर सतत नोटा उडवत होते. यावेळी नववधू अत्यंत गंभीर चेहऱ्याने उभी असलेली दिसली. तिच्यावर नोटा उडवल्या जात होत्या आणि ती हसण्याचे नाव घेत नव्हती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत ‘जेव्हा लग्न तुमच्या पसंतीचे नसते तेव्हा असे होते’ अशा कमेंटही केल्या आहेत. तर काही लोकांनी या व्हिडिओचा बळजबरीच्या लग्नाशी संबंध जोडला. तर अनेकांनी विवाह सोहळ्यातील ही एक प्रथा असल्याचे म्हटले आहे.