गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनचा निर्णय
बेळगाव : गणेशभक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी परिवहनने रात्री उशिरापर्यंत बसेसची सोय केली आहे. शहरी भागात ही अतिरिक्त बस धावणार आहे. वडगाव, अनगोळ, शहापूर, टिळकवाडी आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बसेस धावणार आहेत. गणेशोत्सवाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. गणेशाचे दर्शन घेण्याबरोबर हालते देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होवू लागली आहे. त्यामुळे विविध मार्गावर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागातून गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. दरम्यान प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविल्या आहेत. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे काही मार्गावर बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत शहरांतर्गत बससेवेत वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळाकरिता शहरात अतिरिक्त बसेस धावणार आहेत. गणेशोत्सवामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक व इतर बसथांब्यांवर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बससेवेवरदेखील परिणाम होवू लागला आहे.