शाहूनगरात 11 लाखांची घरफोडी, शास्त्रीनगर, तारिहाळ येथेही डल्ला
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गेल्या 24 तासांत बंजारा कॉलनी-शाहूनगर, शास्त्राrनगर चौथा क्रॉस व तारिहाळ येथे चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून बेळगावात सर्वसामान्यांची मालमत्ता किती सुरक्षित आहे? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
बंजारा कॉलनी, शाहूनगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून 11 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. गुरुवारी रात्री चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटय़ांनी सहा लाख रुपये रोख व 90 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 11 लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे.
कंत्राटदार श्रीकांत लमाणी यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या घराला कुलूप लावून श्रीकांत व त्यांचे कुटुंबीय गावच्या यात्रेनिमित्त रामदुर्ग तालुक्मयातील दाडीभावीतांडा येथे गेले होते. गुरुवारी रात्री हे कुटुंबीय बेळगावला परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला असून कपाट फोडून दागिने व रोकड पळविली आहे.
श्रीकांत लमाणी हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. गावची जत्रा संपवून लवकर बेळगावला परतायचे आहे म्हणून त्यांनी दागिने व रोकड घरातच ठेवली होती. शाहूनगरला लागूनच असलेली बंजारा कॉलनी वर्दळीच्या ठिकाणी आहे. चोरटय़ांनी पाळत ठेवून आपला कार्यभार उरकला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
नागरिक हैराण
बेळगाव शहर व तालुक्मयात चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे. परगावी जाऊन घरी परतेपर्यंत आपले घर सुरक्षित असेलच असे नाही. केवळ दूध आणि भाजी घेऊन येईपर्यंत चोरटय़ांनी डाव साधल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. या घटनांमागे आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली असून प्रत्यक्षात गुन्हेगारांची धरपकड करण्यात मात्र पोलिसांना वारंवार अपयशच येत आहे.