आमदार, उपमहापौरसह नगरसेवकांनीही घेतला सहभाग
बेळगाव : सफाई कामगार दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये सफाई कामगारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी आमदार राजू सेठ, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह नगरसेवकांनीही स्पर्धेत भाग घेतला. यामुळे सफाई कामगार आनंदित झाले होते. वर्षभर शहर स्वच्छ करायचे, पहाटे उठून कामाला लागायचे, हे नित्याचे काम सफाई कामगारांना असते. त्यांना कधीच विरंगुळा नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी महापालिकेच्यावतीने एक दिवस स्पर्धा तसेच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. क्रिकेट, कब•ाr, लिंबू-चमचा यासह इतर स्पर्धांचे आयोजन केले होते. पोलीस परेड मैदानावर या स्पर्धांचे उद्घाटन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये महिला तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या कर्मचाऱ्यांसाठी नास्टा तसेच जेवणाची सोय केली होती. त्यांच्यासाठी महापालिकेचे अधिकारीही खेळात सहभागी झाले होते. नगरसेवकांनीही विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व आमदार राजू सेठ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शहरातील 58 वॉर्डांमध्ये उत्तम काम करणाऱ्या 58 सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य निरीक्षकांचाही गौरव करण्यात आला. सफाई कामगार दिनानिमित्त या कामगारांसाठी महापालिकेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, गिरीश धोंगडी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.