वापर नसल्याने, मनपाच्या निधीचा दुरूपयोग : रिक्षा गॅरेजमध्ये पडून
बेळगाव : शहरातील कचऱ्याचे उचल करण्यासाठी ई-रिक्षाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. तसेच याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दोन ई-रिक्षा खरेदी करून काही दिवस ई-रिक्षाद्वारे कचऱ्याची उचल करण्यात आली. मात्र सदर रिक्षाचा वापर थांबला असून सध्या धूळखात थांबल्या आहेत. महापालिकेने सहा ई-रिक्षा खरेदी केल्या असून रिक्षा खरेदीसाठी खर्ची घातलेला निधी वायफळ गेला असल्याची टीका नागरिक करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरोघरी जावून कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. याकरिता प्रारंभी घंटागाडीचा वापर करण्यात आला. सध्या टाटा एस रिक्षाद्वारे कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांमुळे शहरात प्रदूषण वाढत आहे. तसेच घरोघरी जावून कचऱ्याची उचल करण्यासाठी रिक्षा सातत्याने थांबवावी लागते. परिणामी इंधन खर्च वाढतो. या सर्व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने घरोघरी जावून कचऱ्याची उचल करण्यासाठी ई-वाहनांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर दोन ई-रिक्षा महापालिकेने खरेदी केल्या होत्या.
सदर ई-रिक्षासाठी महापालिकेने साडेतीन लाखांचा निधी खर्च केला होता. या रिक्षाद्वारे काही महिनेच कचऱ्याची उचल करण्यात आली. त्यानंतर या ई-रिक्षा धूळखात पडल्या आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी ई-रिक्षाची क्षमता पाहण्यासाठी हनुमाननगर येथे चाचणी घेतली होती. त्यानंतरच दोन रिक्षा खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली होती. मात्र ई-रिक्षा सध्या सदाशिवनगर येथील गॅरेजमध्ये पडून आहे. या रिक्षाचा वापर केला जात नसताना पुन्हा सहा रिक्षा महापालिकेने खरेदी केल्या आहेत. ई-रिक्षा व्यवस्थित चालत नसल्याचे सांगण्यात येते. तर नवीन रिक्षा खरेदी करण्यासाठी निधी खर्च केला आहे. मनपाने खरेदी केलेल्या सर्व ई-रिक्षांचा वापर थांबला असून रिक्षा खरेदी करण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला दहा लाखाचा निधी वायफळ गेला आहे. यामुळे महापालिकेच्या निधीचा दुऊपयोग होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.