106 वर्षीय श्याम शरण नेगी यांचे निधन ः राज्य सन्मानाने अखेरचा निरोप
किनौर / वृत्तसंस्था
स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार म्हणून ओळख असणारे श्याम शरण नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून हिमाचल प्रदेशमधील शॉन्गथाँग येथील सतलजच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. होमगार्ड बँड वाजवून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी किन्नौर पोलिसांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. नेगी यांच्या अंत्ययात्रेला मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरचे रहिवासी असणाऱया नेगी यांचे वय 106 वर्षे इतके होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 2 नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता.
दिवंगत श्याम शरण नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय व्यवस्था करण्यात आल्याचे किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसैन यांनी सांगितले. अंत्ययात्रेदरम्यान निवडणूक निरीक्षक, उपायुक्त किन्नौर आबिद हुसैन सादिक, एसपी विवेक चहल, एसडीएम कल्पा शशांक गुप्ता यांच्यासह प्रशासनाच्या पथकाने त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याचदरम्यान केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त श्याम शरण नेगी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी श्याम शरण नेगी यांच्या कार्याचे कौतुक केले. मतदानासाठी त्यांनी बजावलेले कार्य देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले. त्यांचा मतदानाचा उत्साह आमच्या तरुण मतदारांसाठी उत्साहवर्धक ठरो, असेही ते पुढे म्हणाले.
1951 नंतर सातत्याने मतदान
श्याम शरण नेगी यांनी 1951 मध्ये झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिले मतदान केले होते, त्यामुळे ते देशातील सर्वात वयस्कर आणि पहिले मतदार मानले जातात. त्यानंतर आजपर्यंत नेगी प्रत्येक निवडणुकीत बूथवर येऊन मतदान करत होते.
तीन दिवसांपूर्वीच पोस्टलद्वारे शेवटचे मतदान
नेगी यांनी 2022 च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या घरी पोस्टल बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यात आले. ते नुकतेच निवडणूक अधिकाऱयाला 12-डी फॉर्म परत करून चर्चेत आले होते. त्यांनी मी मतदान केंद्रावरच जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत फॉर्म परत पाठवला होता. मात्र नंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे निवडणूक अधिकाऱयांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोस्टल मत घेतले. अशाप्रकारे जगाचा निरोप घेण्यापूर्वीच ते मतदानाचे कर्तव्य पार पाडून गेले.
मतदारांची पाठ अन् पहिल्या मतदाराचा मान
किन्नौर येथे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने 1952 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये त्याआधीच निवडणुका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नौर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती. किन्नौर हा अतिशय दुर्गम भाग होता. त्यातही पहिल्यांदाच मतदान असल्याने मतदानाला कोणीच उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी नेगी यांनी स्वतःच आपले मतदान केले आणि ते देशाचे पहिले मतदार ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर नेगी यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात फिरून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.