बलराम निवासी शाळेतील स्वागताने गेले भारावून श्रम प्रतिष्ठेसह संस्कृतीचे संवर्धन करण्याचा सल्ला
काणकोण : आमोणे येथील बलराम निवासी शाळेला रविवारी दिलेल्या भेटीवेळी तेथील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने डेन्मार्कचे भारतातील राजदूत प्रेडी स्वेन यानी जिंकली. शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारतीय पद्धतीने ओवाळून आणि कपाळाला टिळा लावून त्यांचे ज्यावेळी स्वागत केले त्यावेळी आपण अगदी भारावून गेलो असल्याचे स्वेन यांनी सांगितले. येथील खाद्य संस्कृतीवर अगदी तुटून पडताना पातोळ्यो, सुया यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांवर जसा त्यांनी ताव मारला त्याचप्रमाणे बलराम निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्यांमध्ये भाग घेऊन हातात टिपऱ्या घेऊन नृत्य करायला देखील ते मागे राहिले नाहीत. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सभापती रमेश तवडकर, मुख्याध्यापिका सविता तवडकर आणि इतरांनीही ताल धरला. एका देशाचे राजदूत असतानासुद्धा अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागणुकीमुळे येथील लोकांची मने स्वेन यांनी काही क्षणांतच जिंकली.
डेन्मार्कच्या साहाय्याने मोठे बदल घडविणे शक्य
आपला देश अगदी लहान असला, तरी धनधान्याने परिपूर्ण असा आहे. शिक्षण, आरोग्य यांना महत्त्व देतानाच श्रम प्रतिष्ठा सांभाळा. आपल्या संस्कृतीचे संवर्धन करून आपल्या देशाचे रक्षण करा, असा सल्ला स्वेन यांनी आपल्या भाषणातून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी संस्कृतीला प्राधान्य दिलेले आहे. नव्या पिढीने त्याचा आदर करायला हवा. पर्यटन क्षेत्राकडेही लक्ष द्यायला हवे. आपण या भागाकडे पाहून भारावून गेलो आहे. येथील लोक प्रेमळ आणि आदरातिथ्य करणारे आहेत हे आपण ऐकून होतो, मात्र प्रत्यक्ष अनुभवाने आपण भारावून गेलो आहे. आपल्या देशाच्या साहाय्याने काणकोणसारख्या भागात कृषी, दुग्ध व्यवसाय आणि मासेमारी व्यवसायात मोठे बदल घडविणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय शिबिर, रुग्णवाहिकेचे उद्घाटन
यावेळी फ्रेडी स्वेन यांच्या हस्ते बलराम निवासी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दृष्टी फाऊंडेशनच्या सहकार्याने या ठिकाणी नेत्रचिकित्सा आणि वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. भारतीय शल्य संस्थेतर्फे आणल्या गेलेल्या फिरत्या रुग्णवाहिकेचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांनी या रुग्णवाहिकेत आपली चिकित्साही करून घेतली. यावेळी झालेल्या समारंभात बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके, दांडिया, कळशी, फुगडी, कुणबी नृत्य, भरतनाट्याम, मणिपुरी नृत्य यासारखे नृत्यप्रकार सादर केले. व्यासपीठावर सभापती तवडकर, बलराम निवासी शाळेचे अध्यक्ष अंकुश गावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, श्रीस्थळचे माजी सरपंच गणेश गावकर व डॉ. आनंदकुमार त्रिपाठी उपस्थित होते.
डेन्मार्कचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न : तवडकर
‘2030 पर्यंत समृद्ध काणकोण’ आणि ‘काणकोण : व्हिजन अँड मिशन’ या संकल्पनांच्या अंतर्गत डेन्मार्कचे राजदूत स्वेन या ठिकाणी आलेले असून डेन्मार्कने दुग्ध आणि कृषी क्षेत्रांत जशी क्रांती केलेली आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीतही तो देश आघाडीवर आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि दुग्ध क्षेत्रांत त्यांचा आपल्याला लाभ मिळवून घेण्याचा हा प्रयत्न आहे. डेन्मार्कने अन्य राज्यांना खूप सहकार्य केलेले आहे. त्यांचा लाभ आपल्या राज्याला पर्यायाने काणकोण मतदारसंघाला करून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. अंकुश गावकर यांनी स्वागत केले, तर सविता तवडकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी बलराम शिक्षणसंस्थेतर्फे पारंपरिक समई, शाल आणि श्रीफळ देऊन स्वेन यांचा सभापती तवडकर यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेषा खोलकर यांनी केले. जानू तवडकर यांनी आभार मानले.
‘श्रमधाम’ योजनेतील घरांची पाहणी
संध्याकाळच्या सत्रात फ्रेडी स्वेन यांनी राजबाग, तारीर येथील दि ललित रिसॉर्टमध्ये श्रमधाम संकल्पना आणि त्यातून गृहउभारणी यावरील चित्रफीत पाहिली आणि या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या अर्धफोंड येथील हरिश्चंद्र नाईक, राजबाग-तारीर येथील प्रीती पागी आणि आगोंद येथील विनंती वेळीप यांच्या घरांची पाहणी केली. सभापती तवडकर यांच्या संकल्पनेचे त्यांनी मोकळ्या मनाने कौतुक केले. त्यापूर्वी भाजपाच्या मंडळ समितीबरोबर त्यांनी बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सकाळी स्वेन यांनी सभापती तवडकर यांच्यासमवेत श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालयाला भेट दिली आणि श्रींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठोबा देसाई, प्रशांत देसाई, नरेश देसाई, सम्राट भगत, सिद्धार्थ देसाई, नागेश कोमरपंत, गणेश गावकर, राजेंद्र भगत, उमेश तुबकी आणि अन्य उपस्थित होते.