अजूनही 45 जण बेपत्ता ः उपचारासाठी 35 जणांना पेले एअरलिफ्ट
श्रीनगर / वृत्तसंस्था
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कराने शनिवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले. 35 जखमींना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. 45 लोक अद्याप बेपत्ता असून पर्वतमय भागात बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजता अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. या दुर्घटनेवेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. पवित्र गुहेजवळून 15,000 लोकांना सुरक्षितपणे पंचतरणी येथे नेण्यात आले आहे. ढगफुटीमुळे भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन-तीन लंगर डोंगरावरून आलेल्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांना त्याचा फटका बसला. अनेक यात्रेकरू बेपत्ता असून जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेल्याची भीती आहे.