शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी उद्यानाचा विकास करणे गरजेचे : संरक्षण खाते-कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे चौकातील उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बैठकीत मांडण्यात आला होता. या ठिकाणी सैनिक स्मारक तयार करून उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव आमदारांनी तयार केला होता. याकरिता आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन तत्कालीन अध्यक्षांनी दिले होते. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नसून उद्यानाचा विकास रखडला आहे. त्यामुळे सैनिक स्मारक तयार करण्याचा प्रस्ताव हवेतच विरला आहे.
गोगटे चौकाशेजारी उद्यान निर्माण करण्यात आले होते. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डकडून उद्यानाची देखभाल व्यवस्थितपणे करण्यात आली नाही. परिणामी उद्यानात झाडे-झुडपे वाढून उद्यानाचे सौंदर्य हरविले आहे. या ठिकाणी झाडे-झुडपे वाढल्याने साप-किडय़ांचा वावर वाढला आहे. तेथे काही बेघर नागरिक वास्तव्य करीत असतात. तसेच कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या उद्यानाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. जवळच सुसज्ज असे रेल्वेस्थानक, बसस्थानक, उड्डाण पूल आणि चौक आहे. मात्र उद्यानाची दुरवस्था झाली आहे.
उद्यानाच्या विकासाबाबत कारवाई नसल्याने नाराजी
उद्यानाच्या विकासाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. सदर उद्यानाचा विकास करून सैनिक स्मारक निर्माण करण्याचा प्रस्ताव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मांडला होता. बैठकीनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद कलवाड आणि कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांसह उद्यानाची पाहणी करण्यात आली होती. सदर जागा संरक्षण खात्याची असल्याने खासगी उद्यान निर्माण करता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सैनिक स्मारक करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याकरिता आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी दिले होते. पण या उद्यानाच्या विकासाबाबत पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे वर्षानंतरही या ठिकाणी झाडे-झुडपेच आहेत.
सैनिक स्मारक बनविण्याचा प्रस्तावही हवेतच
शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी उद्यानाचा विकास करणे गरजेचे आहे. पण संरक्षण खाते आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे उद्यानाचा विकास रखडला आहे. त्यामुळे सैनिक स्मारक बनविण्याचा प्रस्तावही हवेत विरला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.