करंबळ येथील घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली
खानापूर : खानापूर-नंदगड रस्त्यावर असलेल्या करंबळ गावच्या प्रवेशद्वाराजवळ मालवाहू ट्रक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत माहिती अशी की, गोवा येथून मशीन भरून चेन्नईकडे चाललेली अशोक लेलँन्ड नवीन ट्रक क्रमांक के. 22-ए-ए 2082 पलटी झाल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत हकीकत अशी की, झाडशहापूर येथील ट्रक गोवा येथे नवीन मशीन भरून चेन्नईकडे जात असताना, करंबळ गावच्या प्रवेशद्वारावर एका वळणावर मशीनला बांधलेला दोर तुटल्याने ट्रकमधील मशीन एका बाजूला सरकली व ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या घराच्या अंगणात पडली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली. अंगणात कोणीही नसल्याने तसेच गावातील वर्दळ मंदावली होती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.. अपघाताच्या आवाजाने नागरिक भयभीत होऊन अपघातस्थळी जमले.