32 मजले, 10 ते 15 सेकंद आणि आज होणार
स्थळ नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसनजीकचे सेक्टर 93ए! घडय़ाळात आज दुपारी अडीचचा ठोका वाजेल, त्याचवेळी ऍपेक्स व सियान या वादग्रस्त ट्विन टॉवरला स्फोटकांच्या मदतीने उद्ध्वस्त करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होईल.अवैध बांधकाम, भ्रष्टाचाराचे आरोप करत सदनिका खरेदीदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले. पुढे सुपरटेक बिल्डर व नोएडा ऑथोरिटीने सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने मागील आदेश कायम ठेवला.या निकालाची कार्यवाही होत आज 3,700 किलो स्फोटके वापरुन सदर ट्विन टॉवर 15 सेकंदांपेक्षाही कमी वेळेत उद्ध्वस्त केले जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या, अवैध बांधकामाच्या आधारावर उभा हा ‘ट्विन टॉवर’ आज खऱया अर्थाने जमीनदोस्त होणार आहे.
ट्विन टॉवरचे अंतरंग!
एकूण सदनिका ः 900
शॉप ः 15
बेसमेंट ः 2
दोन्ही टॉवर्सचा परिसर ः 7.5 लाख चौरस फूट.
सीसीटीव्ही ः 300
पेरलेली विस्फोटके ः 9,642
ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्याचा आदेश कशामुळे?
नॅशनल बिल्डींग कोडचा भंग केल्यामुळे सदर ‘ट्विन टॉवर’ उद्ध्वस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आणि सर्वोच्च न्यायालयाकडून ते कायम राखण्यात आले. 24 मजले मंजूर असताना तब्बल 40 मजले बांधण्यात आले, हा यातील सर्वात मोठा घटक. निवासी सदनिका असलेल्या दोन टॉवर्समध्ये किमान 16 मीटर्सचे अंतर असावे, असा नियम आहे. मात्र, येथील दोन टॉवर्समध्ये फक्त 9 मीटर्स अंतर ठेवण्यात आल्यामुळे नॅशनल बिल्डिंग कोडचा भंग झाला. या ट्विन टॉवरची मूळ जागा पार्कसाठी आरक्षित होती. सुपरटेक बिल्डर्स व नोएडा ऑथोरिटीच्या संगनमताने नियमांचा भंग झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
उद्ध्वस्त करण्याचे कंत्राट कोणाकडे?
मुंबईस्थित एडिफिस इंजिनियरिंग व त्यांचे दक्षिण आफ्रिकन पार्टनर फर्म जेट डेमोलिशन्स यांच्याकडे ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्याचे कंत्राट सोपवण्यात आले आहे. यापैकी एडिफिस इंजिनियरिंगने यापूर्वी केरळमधील निवासी संकुल, तेलंगणचे सचिवालय, मुख्य कारागृह तसेच गुजरातमधील जुने मोटेरा स्टेडियमच्या इमारतींचे डेमोलिशन केले आहे.
सारा खेळ अवघ्या 13 ते 15 सेकंदांचा!
एडिफिस इंजिनियरिंग पार्टनर उत्कर्ष मेहता यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत पेरण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट होण्यासाठी साधारणपणे 9 ते 10 सेकंद आणि त्यानंतर सर्व ढिगारा खाली येण्यास साधारणपणे 4 ते 5 सेकंदांचा अवधी लागणार आहे. एकंदरीत अवघ्या 13 ते 15 सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त होणार आहे.
सायंकाळपर्यंत सारा परिसर ‘एक्सक्लजन झोन’
आज ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त केला जाण्यापूर्वी साधारणपणे 450 मीटर्सचा परिसर एक्सक्लजन झोन म्हणून जाहीर केला गेला असून या परिसरात कोणतीही व्यक्ती, वाहन किंवा प्राणी येणार नाही, यासाठी सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाणार आहे. त्याचबरोबर 150 ते 200 वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय चार फायर इंजिन आणि डझनहून अधिक अग्निशमन दलाच्या गाडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. सुपरटेक ट्विन टॉवर पाडले जाणार असल्यामुळे नोएडा पोलिसांनी 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ड्रोनवर बंदी घातली आहे. सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी हा निर्णय घेतला.
आसपासच्या 5 हजार नागरिकांना घर रिकामे करण्याची सूचना
या ट्विन टॉवर्सपासून केवळ 9 मीटर्सच्या अंतरावर इमरॅल्ड कोर्ट व एटीएस व्हिलेज अशा दोन हाऊसिंग सोसायटी असून त्यातील 5 हजार नागरिकांना सकाळी 7 पूर्वी घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व नागरिक ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर सायंकाळी 4 नंतरच आपापल्या घरी परत येऊ शकतील. घराचे दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बंद असावेत, तसेच वॉल सॉकेटमधून सर्व प्लग काढलेले असावेत, अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. या सर्व फ्लॅट्समधील पाईप गॅस सप्लाय सकाळी 6.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
दुपारी सव्वादोन ते पावणेतीनपर्यंत एक्स्प्रेस वे देखील बंद!
द नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे एरवी बऱयाच रहदारीचा असला तरी आज दुपारी 2.15 ते 2.45 या वेळेत हा एक्स्प्रेस वे पूर्ण बंद केला जाणार आहे. दोनपेक्षा अधिक वाहने असणाऱया निवासी संकुलधारकांना आवश्यकतेनुसार पार्किंग उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
ट्विट टॉवर्सच्या पुढे तैनात असतील ऍम्बुलन्स व फायर टेंडर्स!
ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त करण्यासाठी 3700 किलोग्रॅम स्फोटकांचा वापर केला जाणार असून 15 कर्मचाऱयांचा या प्रक्रियेत दुरुन सहभाग असेल. खबरदारी म्हणून फायर टेंडर्स व ऍम्बुलन्सना पाचारण केले जाणार असून 2,100 पोलीस घटनास्थळी हजर असतील.
स्फोटानंतर उरणार 35 हजार क्युबिक मीटर्सचा ढिगारा
32 मजल्याचे ऍपेक्स व 29 मजल्याचे केयेन हे वादग्रस्त टॉवर्स जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जागी थोडेथोडेके नव्हे तर 55 हजार टन ढिगारा असेल आणि तो ढिगारा शास्त्रीयदृष्टय़ा नियोजनबद्ध रितीने हलवावा लागणार आहे. यापैकी 4 हजार टन लोखंड व स्टील रिसायकलिंगसाठी वापरले जाणार आहे.
ढिगारा उपसण्यासाठी लागणार 90 दिवस!
अवघ्या 13 ते 15 सेकंदात हे ट्विन टॉवर्स जमीनदोस्त केले जाणार असले तरी खरे आव्हान त्यानंतर असेल. हा प्रचंड ढिगारा उपसण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे. शिवाय, ‘डस्ट मॅनेजमेंट’चा स्वतंत्र विचार करावा लागणार आहे.
घटनाक्रम
2004 ः सुपरटेक इमरॅल्ड कोर्ट हे निवासी संकुल बांधण्यासाठी नोएडातील सेक्टर 93ए येथील जागा निवडण्यात आली.
2005 ः नोएडा ऑथोरिटीची 14 टॉवर व 9 फ्लोअरच्या बिल्डींग प्लॅनला मंजुरी
2012 ः नोएडाने सुपरटेकचा 40 मजल्यांचा सुधारित प्रस्ताव मंजूर केला.
डिसेंबर 2012 ः इमरॅल्ड कोर्ट रेसिडेंटच्या वेलफेयर असोसिएशनची अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव. बांधकाम अवैध असल्याचा दावा.
एप्रिल 2014 ः अलाहाबाद उच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले. शिवाय, फ्लॅट खरेदीदारांना 14 टक्के व्याजासह मूळ रक्कम परत करण्याची सूचना केली. मात्र, नंतर बराच काळ काहीही कार्यवाही झाली नाही.
ऑगस्ट 2021 ः सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत ट्विन टॉवर उद्ध्वस्त करुन त्याजागी कायदेशीर निवासी संकुल उभे करण्याची सूचना केली.
ऑगस्ट 2022 ः मागील दोन-एक आठवडय़ापासून ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी 3,700 किलोग्रॅम स्फोटके या टॉवरमध्ये पेरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज दुपारी 2.30 नंतर विस्फोटके उडवून दोन्ही टॉवर्स उद्ध्वस्त केले जातील आणि त्या 10 सेकंदानंतर या ठिकाणी असेल 55 हजार टन ढिगारा!