संयुक्त राष्ट्रसंघात विदेशमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन : सुरक्षा परिषदेत सुधार होणे काळाची गरज
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित केले आहे. जग सध्या आव्हानात्मक कालखंडाला सामोरे जात आहे. काळ आता बदलला असून आता अन्य देशांचे म्हणणेही ऐकून घ्यावे लागणार आहे. निवडक देशांचा अजेंडा जगावर लादला जाऊ शकत नाही असे खडेबोल जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वावरून सुनावले आहेत. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत बदल करण्याच्या भारताच्या मागणीचा जगासमोर पुनरुच्चार केला आहे. तत्पूर्वी जयशंकर यांनी याच मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव एंटोनियो गुतेरेस यांची भेट घेतली होती.
कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान जयशंकर यांनी कुठल्याही देशाचे नाव घेणे टाळून राजकारणासाठी दहशतवादाला थारा देणे गैर असल्याचे वक्तव्य केले आहे. सार्वभौमत्वाचा आदर आवश्यक आहे, परंतु हा आदर निवडक असू नये असे आमचे मानणे असल्याचे म्हणत जयशंकर यांनी कॅनडाला चांगलेच सुनावले आहे. यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील संबोधनात कॅनडाच्या भूमीवर हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताच्या एजंट्सचा हात असल्याचे म्हटले होते.
जग सध्या उलथापालथीचा असाधारण कालखंड अनुभवत आहे. भारताच्या वर्न अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर व्हिजनमध्ये केवळ काही लोकांचे छोटे फायदे नव्हे तर अनेक लोकांच्या चिंता सामील आहेत. काही निवडक देश अजेंडा निश्चित करणार आणि इतर देश त्यांच्यासोबत जाणार अशी अपेक्षा करण्याचे दिवस संपले आहेत. सर्वांवर समान स्वरुपात लागू झाले तरच नियुक्त उपयुक्त ठरत असतात असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
गटनिरपेक्षतेच्या युगापासून आता आम्ही विश्व मित्राच्या युगात पोहोचलो आहोत. आम्ही नेतृत्व शक्ती होण्याची इच्छा बाळगून आहोत. आम्ही मोठी जबाबदारी स्वीकारण्यास आणि स्वत:चे योगदान देण्यास तयार आहोत असे ते म्हणाले. यावेळी जयशंकर यांनी भारताच्या संसदेत संमत महिला आरक्षण विधेयकाचाही उल्लेख केला. लोकशाहीच्या प्राचीन परंपरांमध्ये आधुनिक पद्धतींचा पाया रचला गेला असून आमचा विचार, दृष्टीकोन आणि कार्य अधिक उपयुक्त असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
पूर्व-पश्चिम ध्रूवीकरण तीव्र असताना नवी दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेने कूटनीति आणि संवाद हेच प्रभावी असल्याचे दाखवून दिले आहे. भारत विधि भागीदारांसोबत सहकार्य वाढवू इच्छितो.विविध देशांसोबत जोडले जाण्याची आणि हितांकरता सामंजस्य स्थापित करण्याची आमची क्षमता आणि इच्छाशक्ती यातून व्यक्त होते. हा प्रकार क्वाडच्या वाढत्या महत्त्वातही दिसून येतो. तसेच ब्रिक्स समुहाचा विस्तार तसेच आय2यू2 च्या निर्मितीही हे समान स्वरुपात स्पष्ट होते असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
आफ्रिकन महासंघाला सदस्यत्व
भारताच्या पुढाकारामुळेच जी-20 मध्ये आफ्रिकन महासंघाला स्थायी सदस्यत्व मिळाले आहे. भारताने एका पूर्ण खंडाला आवाज मिळवून दिला आहे. आफ्रिका खंड याकरता दीर्घकाळापासून पात्र होता. या महत्त्वपूर्ण पावलामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने सुरक्षा परिषदेचे महत्त्व टिकवून देण्यासाठी सुधारणा करण्याची प्रेरणा घ्यावी असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
नमस्ते फ्रॉम भारत
जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतील स्वत:च्या संबोधनाची सुरुवात ‘नमस्ते फ्रॉम भारत’ या शब्दांसह केली. त्यांच्या या शब्दांनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. केंद्र सरकारने आता जवळपास सर्वच कार्यक्रम, सोहळ्यांमध्ये भारत असा देशाचा नामोल्लेख करण्यास सुरुवात केली आहे.