इंग्लंडमधील दांपत्याने स्वीकारला अनोखा मार्ग
स्वतःसाठी एक सुंदर घर तयार करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु काही जणांना एका ठिकाणी कायमस्वरुपी राहण्याऐवजी फिरत राहणे आवडते. इंग्लंडमध्ये राहणारे दांपत्य कीरा आणि रिचर्ड रीड यांनी स्वतःचा नियमित जॉब सोडून मुलांसमवेत भटकंतीचे जीवन निवडले आहे. यामुळे आपल्याला मोठा लाभ होत असल्याचे या दांपत्याचे म्हणणे आहे. या दांपत्याचा कम्ब्रियामध्ये एक 3 बेडरुमचा फ्लॅट होता, जो विकून त्यांनी 3 मुले आणि एका पाळीव श्वानासोबत व्हॅनमध्ये जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.
कीरा आणि रिचर्ड हे इतरांप्रमाणे 9-5 या वेळेतील नोकरी करत होते आणि सधन म्हणून जगत होते. अशा स्थितीत त्यांनी स्वतःचे घर विकून एका व्हॅनला 15 लाख रुपये खर्च करत एक ट्रान्झिट होम तयार करवून घेतला. या व्हॅनमध्ये 5 जणांचे कुटुंब सामावून घेणे सोपे नाही, यामुळे अनेकदा त्यांच्यासमोर अडचण उभी राहते, तरीही त्यांना स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही. या दांपत्याला 6 वर्षांचा, 5 वर्षाचा आणि 2 वर्षांची मुले असून या सर्वांना व्हॅन स्कूलिंगद्वारे शिकावे लागते. ही मुले एकत्र राहतात आणि यामुळे त्यांच्यातील बाँडिंग मजबूत झाले आहे. तर स्वतःच्या पसंतीच्या गोष्टीही त्यांना शिकता येतात.
अधिक होते बचत
आमचा खर्च या जीवनपद्धतीमुळे कमी झाला आहे. 10 दिवसांमध्ये हीटर, कुकर आणि हॉट वॉटरला मिळून आमचा खर्च केवळ 1200 रुपये इतका आहे. तर आहाराचा खर्च मात्र आम्ही कुठल्या देशात आहोत यावर अवलंबून आहे. दर महिन्याला हप्त्याची रक्कम वजा करून आमच्या खात्यातून फारच कमी खर्च झाला आहे. आता आम्ही कर्जमुक्त जीवन जगत आहोत. आम्हाला केवळ इंधन आणि अन्नाबद्दल विचार करावा लागत असल्याचे दांपत्याने म्हटले आहे.