The famous Giroba festival of Sangeli village begins with a bang
ग्रामदेवतेची दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणाऱ्या सांगेली गावच्या प्रसिध्द गिरोबा उत्सवाला रविवारी होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘हर हर महादेव’ या जयघोषात थाटात प्रारंभ झाला. सुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सांगता सोमवारी होणार आहे.या उत्सवासाठी रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. या गावचे ग्रामदैवत गिरीजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यालाच गिरोबा उत्सव म्हणतात. यावर्षी गिरोबाच्या मूर्तीसाठी देवकरवाडीतील तुकाराम लुमा राऊळ यांचे फणसाचे झाड निवडण्यात आले होते. खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीपासून सुरुवात झालेल्या या उत्सवस्थळी गेले दोन आठवडे विविध भरगच्च कार्यक्रम झाले. रविवारी सायंकाळी गिरीजानाथ मंदिरात देवस्थानचे आठ पाच मानकरी, सेवेकरी आणि भाविक आल्यानंतर मंदिराच्या गाभार्यावरील एका बाजूचे छप्पर मोकळे करण्यात आले. यावेळी देवाची पडली भरणे, शेष लावणे आदी पारंपरिक धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर सवाद्य निशाणकाठीसह देवस्थानचे मानकरी सेवेकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने देवकरवाडीतील नियोजित गिरोबा उत्सवस्थळी निघाले.
दीपक गावकर ,ओटवणे