फोंडा : फोंडा तालुक्यातील आडपई गावातील पाच दिवसांची प्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवणूक शनिवार 23 रोजी होणार आहे. आडपई गावात होणारी ही विसर्जन मिरवणूक केवळ फोंडा तालुकाच नव्हे तर संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. मिरवणुकीसाठी गावातील कलाकार व तऊण मंडळीकडून चित्ररथ देखाव्यांची जय्यत तयारी सुऊ आहे. शनिवारी दुपारी 3 वा. खुमणेभाट येथून मिरवणुकीला सुऊवात होणार असून सायं. 6 वा. दत्तमंडपाजवळ सामुहिक आरत्या व त्यानंतर जुवारी नदीत सर्व गणपतींचे विसर्जन होणार आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आडपई ग्रामस्थांनी मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. सर्वत्र स्वागताच्या कमानी उभाऊन व वीज रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. आडपई गावात घरोघरी गणपती पुजले जात नसून सर्व मुख्य कुटुंबांचे गणपती एकत्र पुजण्याची प्रथा आहे. पाच दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर पाचव्या दिवशी मोठ्या थाटामाटात श्रींचे विसर्जन करण्याची अनोखी परंपरा आडपई ग्रामस्थांनी जपली आहे. पौराणिक प्रसंग व सामाजिक विषयांवर संदेश देणारे आकर्षक देखावे, दिंडी, फुगड्या अशा उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. आडपई गावातील कलाकारांच्या कलेचे दर्शन या मिरवणुकीतून घडते. दुपारी 3 वा. प्रत्येक कुटुंबाचा गणपती आपल्या ठरल्या क्रमानुसार मिरवणुकीत सहभागी होणार होणार असून सायं. 6 वा. दत्त मंडपाजवळ सामुहिक आरत्या झाल्यानंतर जुवारी नदीत गणपती विसर्जन होणार आहे.
एकत्र कुटुंबात गणपती पुजण्याची प्रथा
ही विसर्जन मिरवणूक म्हणजे फोंडा तालुक्यातील गणपती उत्सव काळातील मुख्य आकर्षण मानले जाते. विसर्जन मिरणुकीची ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आडपई गावातील कुटुंबांनी जपली आहे. नवीन पिढीनेही ती कायम ठेवली आहे. या गावात घरोघरी गणपती पुजण्याची प्रथा नाही. सर्व कुटुंबिय एकत्र येऊन सामुहिकरित्या गणपती पुजतात. एरवी नोकरी व्यावसायानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेले आडपईवासीय चतुर्थीचे पाच दिवस आवर्जून आपल्या घरी येतात. त्यामुळे संपूर्ण गाव गजबजून जातो. या कुटुंबियांमध्ये खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास आदींचा समावेश आहे.
फेरीबोट सेवेत बदल
मिरवणुकीच्या काळात शनिवारी दुपारी 3.30 ते सायं. 6 वा. यावेळेत आडपई रासई मार्गावरील फेरीबोट सेवेत बदल करण्यात येणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत ही फेरीसेवा रासई दुर्भाट अशी सुऊ राहणार आहे.