फेरीला प्रारंभ, पुरुमेताच्या साहित्यापेक्षा कपडे व अन्य साहित्यांच्या विक्रेत्यांची संख्या जास्त, आठ दिवस चालेल फेरी
मडगाव : मडगावातील पुऊमेताचे फेस्त काल रविवारी उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्त पहाटे होली स्पिरीट चर्चमध्ये मुख्य प्रार्थनासभा, सायबिणीच्या प्रतिमेची मिरवणूक आणि धार्मिक विधी पार पडले. पावसाळ्यासाठी सुक्या मिरच्या, मसाले, सोले, सुके मासे अशा जिन्नसांची साठवणूक करून ठेवण्यासाठी या पुरुमेताच्या फेस्ताची फेरी उपयुक्त ठरत असते. मात्र अलीकडे वरील साहित्यांची विक्री करणारी दुकाने कमी होत चालली असून त्याजागी तयार कपडे आणि अन्य साहित्याची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत चाललली आहे. यंदाही असेच चित्र असून जुन्या तिठो मार्केटनजीक पुरुमेताचे साहित्य मांडलेल्यांत जास्त करून सुके मासे विकणाऱ्यांचा समावेश आहे. त्याखेरीज काही जण सुक्या मिरच्या आणि सोले विक्रीसाठी घेऊन आल्याचे दिसून आले. अलीकडच्या काळात वरील पुरुमेताचे साहित्य वर्षभर बाजारपेठांत उपलब्ध राहत असले, तरी बहुतेक ग्राहक फेस्ताच्या फेरीत असे जिन्नस खरेदी करण्यासाठी आवर्जुन येत असतात.
पालिकेला मिळेल 30 लाखांचा महसूल
दरम्यान, पार्किंग जागेत उभारून दिलेल्या फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्समुळे सुमारे 30 लाख ऊपयांचा महसूल पालिकेला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात एसजीपीडीएकडून मिळणाऱ्या महसुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. गत साली 35 लाख 997 ऊ. एवढा महसूल पालिकेला मिळाला होता, अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. फेस्ताची फेरी मडगाव पालिकेच्या पार्किंग जागेत व एसजीपीडीए मैदानावर भरविण्यात आली आहे. एसजीपीडीए मैदानावर जास्त करून फर्निचरची दुकाने, जायंट व्हील, अॅम्युजमेंट पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा या फेस्त फेरीमधून एसजीपीडीएला किती महसूल मिळेल हे कळलेले नाही. पालिकेला एसजीपीडीएकडून प्रतिदिन 55 हजार ऊ. मिळणार आहेत, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले. यात कचरा उचलण्यासाठीच्या 5 हजार ऊ. शुल्काचा समावेश आहे. पार्किंग प्लाझासाठी जी-सुडाला जागा सुपूर्द करण्याच्या फाईलवर आपण सही केलेली नाही. जर केली असती, तर यंदा या जागेत फेस्त फेरी भरविता आली नसती. शिवाय ज्या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे त्यालाही आपण फेस्ताच्या फेरीसाठी राजी केलेले आहे. पालिकेला जास्तीत जास्त महसुलाची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारासाठीच अडीच कोटी रु. लागतात, असे नगराध्यक्षांनी सांगितले.
आठ दिवस चालेल फेरी
यंदा पुरुमेताच्या फेस्ताची फेरी केवळ 8 दिवसांची असेल. एकही दिवस जादा तिथे स्टॉल्स दिसणार नाहीत, अशी ग्वाही स्टॉल्सवाल्यांनी नगराध्यक्षांना दिली आहे. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस फेरी चालू ठेवण्यास नगरसेवकांनीही विरोध दर्शविला आहे. त्यामुळे काल रविवारी सुरू झालेली फेरी पुढील रविवारपर्यंतच चालेल. पुढील सोमवारी स्टॉल्सवाल्यांना आपले साहित्य उचलण्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पार्किंग प्लाझा उभारण्याची जबाबदारी ‘जी-सुडा’वर सोपविण्यात आली आहे. मात्र ‘जी-सुडा’ने अजून पार्किंग प्लाझाचा नियोजित आराखडा पालिकेला सादर केलेला नाही. त्यामुळे पालिकेने ही जागा पार्किंग प्लाझासाठी ‘जी-सुडा’कडे सुपूर्द केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.