ढोल, ताशे बँड वादनात जंगी स्वागत : जहाजात 651 पर्यटकांचा समावेश
प्रतिनिधी / वास्को
‘वायकिंग मार्स’ हे आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज काल बुधवारी सकाळी 651 पर्यटकांसह मुरगांव बंदरात दाखल झाले. या जहाजात 651 पर्यटक व 452 खलाशी आहेत. या पर्यटकांचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्वागत केले. चालू पर्यटन हंगामातील हे पहिले आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज आहे. मुरगाव बंदर हे ‘पोर्ट ऑफ कॉल‘ व्हावे. जहाजांनी या बंदरात दोन तीन दिवसांचा थांबा घ्यावा, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.
ढोल ताशे व बॅण्डवादनासह पर्यटकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी टॅक्सी व्यवसायिक व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोरोना काळानंतर मुरगाव बंदरात आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज दुर्मिळ ठरले होते. मोठय़ा खंडानंतर जहाज दाखल झाल्याने या जहाजाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या हंगामात देशी व विदेशी मिळून मुरगांव बंदरात 65 पर्यटक जहाजे दाखल होणे अपेक्षित आहे.
मात्र, बंदरात दाखल होणारी पर्यटक जहाजे सकाळी येऊन संध्याकाळी परतीच्या प्रवासाला जातात. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अशा पर्यटक जहाजांचा फारसा लाभ होत नाही. मुरगाव बंदर हे पर्यटक जहाजांसाठी पोर्ट ऑफ कॉल ठरावे. एखादे जहाज दाखल झाल्यानंतर ते दोन तीन दिवस गोव्याच्या बंदरात वास्तव्याला असावे. त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक गोव्यात भ्रमंती करतील. पर्यटन स्थळांना भेटी देतील. त्यामुळे महसुलात वाढ होईल. पर्यटन व्यवसायाला उभारी मिळेल, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी पर्यटकांचे स्वागत करताना सांगितले.