पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या रविवारी (19 फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळय़ानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.
लोकार्पणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पुणे जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत.
‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.
सरकारवाडा मधील ‘दुर्गवैभव’ विभागात आजच्या तरुण पिढीला आपला जाज्वल्य इतिहास तितक्याच प्रभावीपणे समजावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या किल्यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिंग केलेले असून यासाठी होलोग्राफी, ऍनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, 3 डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला असल्याचेही कदम यांनी सांगितले.
नजीकच्या भविष्यात पूर्णत्वास येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये 21 एकर परिसरात एक दिवसांची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर)द्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरु केलेली चलने, राजमुद्रा यांबरोबरच अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल. 21व्या शतकात वावरणाऱ्या प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्तीला येथे आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असा हा प्रकल्प आहे.
लोकार्पणानंतर सरकारवाडा सामान्य नागरिक व शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार असून या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन नोंदणीद्वारे तिकीट बुक करून या ठिकाणची शिवकालीन सफर अनुभविता येणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती रु. 350 (सर्व करांसहित) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.