सातार्डा –
सातार्डा येथील श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या तिसाली फिरती सोहळ्याला गुरुवार दि 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रवळनाथ पंचायतन देवस्थानचा फिरती सोहळा असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन परिसरात स्वच्छता सुरु करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी श्री रवळनाथ मंदिर येथून चार दिवसीय फिरती सोहळ्याला मानकरी, इर्तिक व भाविकांच्या उपस्थितीत ढोलताश्यांच्या गजरात प्रारंभ करण्यात येणार आहे.श्री देव रवळनाथ, देवी माऊली, भूतनाथ देवांचे तरंगखांब व अवसारी देवदेवातांकडून भाविकांच्या समस्या या फिरती सोहळ्यावेळी सोडविण्यात येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
गुरुवारी फिरती सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर रात्री भटवाडी येथील श्री केळकर यांच्या निवासस्थानी देवस्वारी विश्रांती घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि 17 नोव्हेंबर रोजी देवस्वारी श्री पेळपकर यांच्याकडे विश्रांतीसाठी थांबणार आहे. या दोन्ही ठिकाणी पाहुणेर होणार आहे.
शनिवारी दि 18 नोव्हेंबरला देवस्वारी रायाचेपेड येथील देव मांगरात थांबणार आहे. त्यानंतर रविवार दि 19 नोव्हेंबरला तरचावाडा येथून आल्यानंतर देवस्वारी श्री महादेव मंदिरात येणार आहे.या तिसाली फिरती सोहळ्याला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.