यात्रा-जत्रांमुळे मागणी वाढली, उलाढालीत ही वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
यात्रा-जत्रांना प्रारंभ झाल्याने शनिवारी बकरी मंडईत बकऱ्यांचा बाजार बहरला होता. मागील काही दिवसांपासून लम्पीमुळे बकरी बाजार बंद होता. मात्र आता पूर्ववत बकरी बाजाराला सुरुवात झाली आहे. त्यातच यात्रा-जत्रा तोंडावर आल्याने बकऱ्यांची खरेदी-विक्री वाढली आहे. शनिवारी बकरी मंडईत खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल झाली.
लम्पीचा जनावर आणि बकरी बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. मागील पाच सहा महिन्यांपासून हे दोन्ही बाजार बंद झाले होते. त्यामुळे व्यापारी, विक्रेते आणि दलाल अडचणीत आले होते. मात्र आता लम्पीचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जनावरे आणि बकरी बाजारदेखील पूर्ववत सुरू झाला आहे. मोदगा-द•ाr लक्ष्मी यात्रा जवळ आली आहे. त्याबरोबर इतर ठिकाणी देखील यात्रा-जत्रा (माही) प्रारंभ होणार आहे. विशेषत: या जत्रांना बकऱ्यांचा बळी दिला जातो. त्यामुळे बकऱ्यांना मागणी वाढू लागली आहे.
बकरी-कोंबड्यांच्या मागणीत वाढ
साधारण 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांच्या किंमती पहायला मिळाल्या. शिवाय शेळ्या-मेंढ्या आणि लहान पिल्लांचीदेखील विक्री झाली. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर बकरी मंडईतील बकरी बाजार बहरल्याचे पहायला मिळाले. याबरोबर गणपत गल्लीतील कोंबडी बाजारातदेखील मोठी उलाढाल झाली. 500 ते 800 रुपये कोंबड्यांच्या जोडीचा दर होता. एकूणच यात्रा-जत्रांना प्रारंभ होवू लागल्याने बकरी आणि कोंबड्यांना मागणी वाढू लागली आहे.