सभापती रमेश तवडकर यांचे आवाहन, चंद्रकांत कवळेकर यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांचे बक्षिसवितरण
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
आपल्या परंपरा, संस्कृतीचा वारसा युवा पिढीने पुढे न्यावा. सादरीकरणाच्या बाबतीत अजून प्रगती व्हायला हवी. अनेकांत गुण सामावलेले आहेत, ते मांडण्याची संधी तरुणांना लाभली पाहिजे. हेच तरुण कलाकार पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी बेतूल येथे व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री व प्रदेश भाजप उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचे बक्षिसवितरण केल्यानंतर ते बोलत होते.
आपण काणकोणात लोकोत्सवाचे आयोजन करतो. यंदा हा महोत्सव अधिक दर्जेदार बनविला जाणार असून त्यात राष्ट्रीय पातळीवरील कलाकार सहभागी होणार आहेत. या स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी चालू आहे. त्यात नवोदितांना संधी देण्याचा विषय आपल्या विचाराधीन आहे, असे तवडकर यांनी सांगितले. तरुणांना योग्य प्रमाणात वाव मिळाला पाहिजे. आपला गोवा विविधतेने नटलेला पाहून परदेशी नागरिक भाळतात. तितकेच दर्जेदार संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारे कार्यक्रम ठेवायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कवळेकर कुटुंबियांचा गणेशोत्सव आता साऱया गोमंतकीयांना माहीत झाला आहे. या उत्सवातून कलाकारांना चांगली संधी दिली जाते. गेली 27 वर्षे कवळेकर कुटुंबीय यानिमित्ताने चांगले कार्यक्रम आयोजित करत आले आहे. बाबू कवळेकर हे सध्या आमदार नसले, तरी सामाजिक क्षेत्रातील तसेच संस्कृती संवर्धन क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे तवडकर यांनी सांगितले. लोकांनी काय योग्य ते पाहायला हवे. राजकीय क्षेत्रात कोणी कायम स्थानावर नसतो, पण तो लोकांच्या मनामध्ये, विचारांत राहू शकतो. मी स्वतः 2017 ते 22 यादरम्यान आमदार नव्हतो. मात्र यंदा पुन्हा लोकांनीच मला निवडून आणले. मी मूळचा एक शिक्षक असून आता सभापतीपदापर्यंत पोहोचलो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विविध स्पर्धांचा निकाल
गणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या अखिल गोवा पातळीवरील रांगोळी, घुमट आरती, फुगडी, वेशभूषा या स्पर्धांना आणि केपे मतदारसंघ मर्यादित स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण रांगोळी कलाकार आकाश नाईक आणि सुनील फातर्पेकर, घुमट आरतीचे विजयकुमार कोप्रे देसाई व सुनील फातर्पेकर, तर फुगडी व वेशभूषा स्पर्धांचे परीक्षण अश्विनी जांबावलीकर, एकनाथ गावकर व तुकाराम गोवेकर यांनी केले. स्पर्धांतील विजेते पुढीलप्रमाणे-रांगोळी ः पहिले बक्षीस भूमेश नाईक फोंडा, दुसरे अर्जुन नाईक, तिसरे दर्शन नाईक. घुमट आरती ः पहिले साई समर्थ आरती मंडळ मडगाव, दुसरे वैरागी नवदुर्गा आरती मंडळ मडकई, तिसरे कोकणपाईक आरती मंडळ मोरपिर्ला. केपे मर्यादित घुमट आरती स्पर्धा-पहिले कोकणपाईक आरती मंडळ मोरपिर्ला, दुसरे विघ्नहर्ता आरती मंडळ बार्से. फुगडी ः पहिले बक्षीस भूमिका कला संघ फोंडा, दुसरे इंद्रादेवी यूथ क्लब इंद्रावाडा-काणकोण, तिसरे महालक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप बार्से. वेशभूषा ः पहिले बक्षीस दित्या शिरवईकर, दुसरे अनुष्का मोरस्कर, तिसरे कन्हैय्या नाईक.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ता उर्फान मुल्ला, खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, पंच बाबू प्रभुदेसाई, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, परीक्षक आकाश नाईक, विजयकुमार कोप्रे देसाई, एकनाथ गावकर, तुकाराम गोवेकर, सुनील फातर्पेकर व इतर उपस्थित होते. सुरुवातीला बाबू कवळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापती तवडकर यांचे स्वागत केले व त्यांनीच नंतर आभार मानले. सूत्रसंचालन खुशाली वेळीप व विजयकुमार कोप्रे देसाई यांनी केले.