वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रिटनच्या स्कॉडलंड भागातील ग्लासगो येथील गुरुद्वारात भारतीय उच्चायुक्तांच्या मानभंग प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना या गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. रोखणारा युवक खलिस्तानवादी होता, असे स्पष्ट झाले आहे. भारताने याप्रकरणी ब्रिटनकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्लासगो येथे गुरुद्वारात एका कार्यक्रमासाठी दोराईस्वामी यांना आमंत्रित करण्यात आले होते. ते या स्थानी प्रवेश करीत असताना त्यांना एका खलिस्तनवादी गटाकडून आडविण्यात आले. शीख युथ युके या नावाने हा गट ओळखला जातो. या गटाचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, असा आरोप आहे. दोराईस्वामी त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार या गुरुद्वारात आले होते.
प्रकरण गंभीरपणे घेणार
या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. गुरुद्वारात हा प्रसंग घडत असताना पोलिसांनी तेथे वेळेवर जाऊन योग्य ती कारवाई केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणार राहिली. यापुढेही अशी कारवाई केली जाणार आहे. या गुरुद्वारात भारतीय अधिकाऱ्यांचा नेहमी सन्मान केला जातो. मात्र, मूठभर अतिरेक्यांनी या मानभंग प्रसंगाचे चित्रण करुन ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. याचा हेतू केवळ स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचा आहे हे स्पष्ट होते. मात्र, ब्रिटनचे प्रशासन केणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात असून खलिस्तानी दहशतवाद्यांनाही ब्रिटनमध्ये कोणतेही स्थान नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
केवळ दोनच तरुण
भारताचे उच्चायुक्त दोराईस्वामी या गुरुद्वारात जात असताना त्यांना आडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यांना आडविण्याचा प्रयत्न करणारे केवळ दोन युवक होते. ते आत कसे येऊ शकले याची चौकशी केली जाईल. अनवधानाने त्यांना आत सोडण्यात आले असण्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रकार समजताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. उच्चायुक्तांच्या संरक्षण व्यवस्थेत कोणतीही ढिलाई नव्हती, असेही प्रतिपादन करण्यात आले.
ब्रिटन शांततेचा समर्थक
ब्रिटन शांततेचा समर्थक असल्याने तो कोणत्याही हिंसक अगर दहशतवादी शक्तींना स्थान देत नाही. सर्वसाधारणपणे ब्रिटनमध्ये सर्व गुरुद्वारांमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना मानाने वागविले जाते. अनेक भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जाते. त्यामुळे ब्रिटनमध्ये खलिस्तानवाद्यांचे अस्तित्व नाममात्र आहे, असे राजकीय तज्ञांचेही मत आहे.