समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार : क्रीडा खात्याची जमीन भाटी पंचायतीला देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
सांगे : आयआयटी प्रकल्प सांगे भागातच येणार असल्याचे स्पष्ट निवेदन सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी कोंगारे, भाटी येथे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या टॉयलेट ब्लॉकच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भाटी, सांगे येथील क्रीडा खात्याकडील 2 हजार चौ. मी. जमीन भाटी ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यास मान्यता दिली असून लवकरच ही जमीन पंचायतीला मिळणार आहे. या जमिनीत सुसज्ज पंचायतघर आणि ‘एमआरएफ शेड’ बांधण्यात येणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पस्ट केले. भाटी पंचायतीला उच्च न्यायालयाने कचरा विल्हेवाटीसाठी ‘एमआरएफ’ शेडची सोय नसल्याने दोन वेळा दंड ठोठावलेला आहे. या ग्रामपंचायतीला त्यामुळे कोणतीही विकासाची कामे करता येत नाहीत, अशी स्थिती आहे. सांगे येथे सुमारे 20 कोटी खर्चाचे कुणबी हस्तकला ग्राम स्थापण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 35 कोटी खर्च अपेक्षित असलेल्या इको-टुरिझम विकास प्रकल्पाचे काम साळावलीतील बोटॅनिकल गार्डन परिसरात सुरू झालेले आहे. गेल्या महिन्याभरात विविध पंचायत क्षेत्रांत सुमारे 80 ग्रामीण सुविधा निर्माण करणारी कामे सुरू झाली आहेत, याकडे फळदेसाई यांनी लक्ष वेधले. जलस्रोत खात्यामार्फत येत्या सहा महिन्यांत 50 कोटी खर्चाची कामे सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साळावलीतील बोटॅनिकल गार्डनमध्ये वेलनेस सेंटरची स्थापना होणार आहे. सांगे मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींची स्वत:ची पंचायतघरे असून तीन ग्रामपंचायतींची पंचायतघरे बांधण्याचे काम चालू आहे. तर भाटी पंचायतघराचे काम जमीन ताब्यात आली की, सोपस्कार पूर्ण करून लगेच चालू करण्यात येणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. गावात गरजेनुसार सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. यासाठी सर्वांची साथ गरजेची आहे, असे ते म्हणाले. गावच्या लोकांच्या मागणीनुसार सुविधा निर्माण करण्यावर आपण भर दिलेला असल्याचे जि. पं. सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले. आपल्याला जो निधी मिळतो तो आपण योग्य कामांवर खर्च करण्यासाठी वापरलेला आहे. तसेच जे साहित्य देण्यात येते ते वितरित केलेले आहे, असे त्यांनी सांगितले. सरपंच चंद्रकांत गावकर यांनी सांगितले की, कोंगारे येथे टॉयलेट ब्लॉक बांधण्याचे श्रेय केपेकर यांना जात असून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ते खूपच क्रियाशील आहेत. कंत्राटदाराने देखील काम लवकर पूर्ण केले असून मंत्री फळदेसाई यांच्या सहकार्यामुळे विकासकामे गतीने होत आहेत. मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते प्रथम नेत्रावळी, मार्गवाडा येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळ बांधण्यात आलेली शेड, ड्रेसिंग रूमचे तसेच नंतर कोंगारे, भाटी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या टॉयलेट ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंच विजेंद्र वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, पंच अश्विनी गावकर, नेत्रावळीच्या पंच रजनी गावकर, अटल ग्राम यंत्रणा अध्यक्ष सुभाष वेळीप आदी मान्यवरही हजर होते.