डॉ. हेमा सोमनाथन : ‘पॉलिनेशन इकॉलॉजी ऍण्ड फूड सिक्मयुरिटी’वर राष्ट्रीय कार्यशाळा
प्रतिनिधी /बेळगाव
मधमाशांचे आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्यांनी पॉलिनेशन (परागीकरण) केल्यामुळे निसर्गाला आपले अस्तित्व टिकवून राहण्यास मदत होते. पॉलिनेशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती सहज घडत असते. त्यामुळे आपले जीवन सोपे होते. फक्त माणसाने जिज्ञासू वृत्तीने त्याचा अभ्यास करायला हवा, असे मत डॉ. हेमा सोमनाथन यांनी व्यक्त केले.
डॉ. हेमा सोमनाथन या केरळच्या आयआयएससीआर स्कूल बायोलॉजी विभागामध्ये कार्यरत आहेत. एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेज व भाऊराव काकतकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 व 29 रोजी ‘पॉलिनेशन इकॉलॉजी ऍण्ड फूड सिक्मयुरिटी’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन दि. 28 रोजी संकल्पभूमी येथे केल्यानंतर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य बी. एल. मजुकर, समन्वयक डॉ. अरविंद हलगेकर, ऍड. राजाभाऊ पाटील व प्रा. एस. वाय. प्रभू उपस्थित होते.
एस. वाय. प्रभू यांनी अन्न आरोग्याच्या दृष्टीने सकस आणि गुणात्मक कसे असावे आणि कसे पिकवावे याची माहिती दिली. ऍड. राजाभाऊ पाटील यांनी कीटकनाशकांमुळे पीक अधिक प्रमाणात आले तरी त्याचा दर्जा खालावतो, त्यामुळे निसर्गासोबत राहायला शिका, असे सांगितले.
प्रारंभी प्रा. बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. समन्वयक प्रा. अरविंद हलगेकर यांनी कार्यशाळेचा हेतू सांगितला. आकाश हिरेमठ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. साईनाथ निश्चल यांनी डॉ. सोमनाथन यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन वैष्णवी कुडतरकर व दानेश्वरी दुंडगे यांनी केले.