पंतप्रधान अन् विरोधी पक्षनेत्यांचा मंदिर-गुरुद्वारांमध्ये जात प्रचार
वृत्तसंस्था/ कॅनबरा
ऑस्ट्रेलियात 21 मे रोजी मतदान होणार असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांना लेबल पार्टीचे उमेदवार अँथोनी एलबनिजी आव्हान देत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या निवडणुकीत तेथील भारतीय वंशीय मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ऑस्ट्रेलियात आता ब्रिटिश समुदायानंतर आता भारतीयच दुसऱया क्रमांकाचा समुदाय ठरला आहे. देशभरात 7 लाखांहून अधिक भारतीय वंशीय ऑस्ट्रेलियात राहत आहेत.
भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक कुठलाही नेता आणि पक्षाचे राजकीय भविष्य निश्चित करू शकतात. मॉरिसन आणि एलबनिजी सध्या मंदिर-गुरुद्वारांमध्ये जात मत देण्यासाठी आवाहन करत आहेत. अन्य पक्षांचे उमेदवार देखील भारतीय समुदायाशी संपर्क साधून मते मागत आहेत. दोन्ही मोठय़ा पक्षांनी या संघीय निवडणुकीत 100 हून अधिक बिगरइंग्रंजी भाषिक देशांशी संबंधित उमेदवारांना तिकीट दिले आहे. यात एक तृतीयांश उमेदवारी भारतीय वंशाच्या नेत्यांना मिळाली आहे.
भारतीय वंशाच्या उमेदवारांना महत्त्व
ऑस्ट्रेलियातील दोन मोठी राज्ये न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये भारतीय वंशीयांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी 2 लाखांहून अधिक भारतीय या राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. न्यू साउथ वेल्सची राजधानी सिडनीच्या पश्चिम भागात दोन्ही पक्षांदरम्यान चुरशीची लढत आहे. लिबरल पार्टीने तेथील ग्रीनवे मतदारसंघात प्रदीप पाठी यांना उमेदवारी दिली आहे. लिबरल पार्टीकडून दोन्ही राज्यांमध्ये भारतीयबहुल भाग असलेल्या पॅरामेटा ग्रीनवे, लेलोर, चिफले, होथम आणि मरीबियोंगमध्ये भारतीय वंशाचे उमेदवार उभे केले आहेत.
लेबर पार्टीकडून हिगिंस, ला ट्रोब, स्वान आणि वेर्रवा भागांमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी डॉ. सुखमनी खुराना यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱया भारतीय समुदायाबद्दल स्थानिक नेत्यांचा इतका ओढा यापूर्वीच कधीच पाहिला नव्हता असे म्हटले आहे.
मोदींसोबतच्या मैत्रीचा किस्सा
मॉरिसन यांनी काही दिवसांपूर्वी भगवी शाल ओढून घेत हिंदू कौन्सिलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. भारतीय समुदायामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता पाहून त्यांनी मोदींसोबतच्या स्वतःच्या मैत्रीचे दाखले तेथे दिले होते. तसेच कौन्सिला 13.5 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. लेबर पार्टीचे उमेदवार अँथोनी यांनीही त्यानंतर कौन्सिलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता.
अत्यंत चुरसपूर्ण निवडणूक
2019 च्या निवडणुकीत भारतीय वंशाचे 21 उमेदवार उभे राहिले होते. ऑस्ट्ऱेलियाच्या अनेक संघीय निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी तेथे आघाडी करावी लागते. अनेक मतदारसंघांमध्ये 1 किंवा 2 टक्के मते निकाल बदलू शकतात.