नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय,श्रीनिवास धेंपो, मिलिंद रमाणींचा मंडळात समावेश
पणजी : नगरनियोजन खात्याच्या काल गुऊवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात येऊन गोमंतकीय जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्य नगरनियोजक राजेश नाईक, व्हर्टिका डागूर, सदस्य पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य व विशेष निमंत्रित उपस्थित होते.
एईडीएससाठी जागा उपलब्ध करणार
सध्यस्थितीत अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याशिवाय अन्य आणीबाणीचे प्रसंगही अनेकांवर ओढवत असतात. अशा प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन टीसीपीने ’ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर’ (एईडीएस) साठी बहुकौटुंबिक निवासस्थानांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा सक्रिय विचार चालविला आहे. प्रकल्पांना परवानगी देताना ही तरतूद समाविष्ट करण्याच्या आवश्यक सूचना शाखा कार्यालये आणि पीडीएला देण्यात आल्या आहेत.
दुरुस्तीच्या इमारतींना वाढीव एफआयआर
मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गृहनिर्माण सोसायट्यांमधील दुऊस्तीची गरज असलेल्या 20 वर्षांवरील सर्व इमारती आणि मालमत्तांना वाढीव एफआयआर आणि राज्यभर एकसमान उंचीसह सूट देण्यात येणार आहे. या धोरणाचा गोव्यातील लोकांना फायदा होईल व त्यांचे जीवनमान सुधारण्यात मदत होणार आहे.
श्रीनिवास धेंपो, मिलिंद रमाणी यांचा मंडळात समावेश
दरम्यान, जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो आणि वास्तुविशारद मिलिंद रमाणी यांचा मंडळात समावेश करण्यात आला आहे. त्या दोघांकडून सल्ले आणि सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार काम करण्यात सरकारला आनंद होईल, असे राणे यांनी म्हटले आहे.
जुन्या सदनिकाधारकांचे हित जपणार
राज्यातील 20 वर्षांपेक्षा जुन्या गृहनिर्माण संस्था तसेच सहकारी संस्था आणि अशा इमारतींमध्ये राहणारे सदनिकाधारक यांच्या हितासंबंधी सरकार, खास करून टीसीपी पूर्णपणे संवेदनशील आहे. यापैकी अनेक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा विचार आहे. त्याद्वारे फ्लॅट मालकांचे हित सुरक्षित करणे, सदनिका मालकांच्या हिताची सुविधा आणि संरक्षण करण्यासाठी खात्याने हा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, असेही राणे यांनी पुढे म्हटले आहे.