राज्यात सुमारे 50 हजार प्रकरणे
प्रतिनिधी /पणजी
सरकारच्या सर्वेक्षणात राज्यात पोर्तुगाल व गोवा (भारतीय) अशा दुहेरी नागरिकत्वाचे सुमारे 50,000 नागरिक असून त्यांनी जन्माची नोंदणी पोर्तुगाल व गोव्यातही केल्याचे समोर येत आहे. त्यांना शोधून काढणे व त्यांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने गोव्यातील दोन्ही जिल्हाधिकाऱयांना दिल्याने हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून अशा प्रकारे दोन्ही जिल्हाधिकाऱयांना असेच निर्देश दिले होते. परंतु, त्याचे पालन झाले नाही. गोवा व पोर्तुगाल असे दुहेरी नागरिकत्व असलेले लोक स्वतःहून पुढे येत नाहीत. शोधायला गेल्यास ते सापडणे कठीण आहे. दुहेरी नागरिकत्व किंवा दुहेरी जन्म नेंदणी करणाऱयांमध्ये सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश असून गोवा मुक्त होण्यापूर्वी म्हणजे 1961 पूर्वी अनेकांनी पोर्तुगालमध्ये नोंदणी केलेली आहे. ती कायम असून त्यातील अनेकांनी गोव्यातही मुक्तीनंतर जन्माची नोंदणी केली. त्यातील काहीजण मृतही पावले आहेत. त्यांच्या काही मुलांनीदेखील तशीच दुहेरी नोंदणी केली असून त्या सर्वांकडे पोर्तुगाल पासपोर्ट किंवा ओळखपत्र असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
माहिती मिळविण्याचा नेमका उद्देश काय?
दुहेरी नागरिकत्व असलेल्यांची माहिती मिळवून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला नेमके काय साधायचे आहे. याचा उल्लेख केंद्राच्या आदेशात नाही. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचा आदेश केंद्राने दिल्यानंतर दोन्ही जिल्हाधिकाऱयांनी गोव्यातील जनतेला आवाहन करून माहिती देण्याची सूचना केली होती. त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता केंद्राने नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी काय करतात, हे पहावे लागेल.