काकती-जाफरवाडी रस्ता डांबरीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी
वार्ताहर /काकती
काकती ते जाफरवाडी संपर्क रस्ता डांबरीकण, दवाखान्याची सोय, सामाजिक न्याय समितीने निपक्ष न्याय-निवाडा देणे, जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची करणे आदी विशेष विषयांवर काकती येथील ग्रामसभा गुरूवारी गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर होत्या. नोडल अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी एस. बी. दासप्पण्णावर यांनी काम पाहिले. स्वागत व प्रस्तावना ग्रामविकास अधिकारी अरुण नाथबुवा यांनी केले. काकती ते जाफरवाडी संपर्क रस्ता डांबरीकरण करणे. जाफरवाडीच्या ग्रामस्थांना दररोज काकतीला विविध कामाकरिता यावे लागते. काकतीला उपतहशीलचा दर्जा असल्याने महसुली कामकाज, रयत संपर्क केंद्र, पोलीस ठाणे, वनविभागाचे कार्यालय अशा विविध कारणासाठी हेलपाटे घालावे लागतात. काकती-जाफरवाडी रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्यात आला असून, या दोन्ही गावांना जोडणारा पक्का संपर्क रस्ता झाल्यास काकतीच्या शेतकऱ्यांना एपीएमसी मार्केटयार्डला शेतमाल घेऊन जाण्यास सुलभ होणार आहे.
गोर-गरिबांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
काकतीत तीस हजारहून लोकसंख्या असूनही अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने गोर-गरिबांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून दवाखाना अथवा हरीत आरोग्य सुविधासाठी मठ गल्लीतील ग्रामपंचायत इमारतीत दवाखाना चालू करावा, तसेच मारूती गल्लीतील गावातल्या शाळेत पटांगणात पावसाचे पाणी साचू नये म्हणून मातीचा भराव टाकून सपाटीकरण करावे अशी मागणी मल्लाप्पा धोणजी व ग्रामस्थांनी उचलून धरली तर सामाजिक न्याय समितीतर्फे गावातील भांडण-तंट्टे न्याय निवाडा निरपेक्षपणे तातडीने सोडविण्यात यावा. याबाबत ग्रामपंचायत पुरेसे लक्ष देत नसल्याचा लक्षवेधी प्रश्न सुरेश गवी यांनी विचारला. नुकतीच पाणी समस्या मिटविण्यासाठी लघुनळाद्वारे घरोघरी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी नळाची जोडणी सुस्थितीत नाही. शास्त्राrनगर व लक्ष्मीनगरात पाईपलाईन घातलेल्या ठिकाणी जैसे थे स्थिती आहे. रस्ते केले नसल्याने रस्त्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.
महिला सदस्यांकडून सभात्याग
ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळेकर यांनी अंगणवाडीना विविध सुविधा वेळेत पुरविणे, एसीएसटी महिलांना रोजगार हमीची कामे देणे अशी मागणी केली. ग्रा. पं. चे एकच सदस्य सर्व समस्या मांडत असल्याने कंटाळून काही महिला ग्रामस्थांनी सभात्याग केला. ग्राम पंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी सर्व प्रश्न व समस्यांचा आढावा घेऊन ठरावपास करून वरिष्ठांकडे पाठवित असल्याचे सांगितले. लेखनिक सोमनाथ बाबी यांनी आभार मानले.
संगणकीय उतार करून घेण्याचे आवाहन
जिल्हा पंचायतीचे ग्राम स्वच्छता अभियानचे सल्लागार सागर रामगोंडा म्हणाले, आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहन केले. ग्राम विकास अधिकारी अरुण नाथबुवा यांनी प्रत्येकानी आपले घर, प्लॅटचे संगणकीय उतारे करून घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुरवावीत असे आवाहन केले.