पुणे / वार्ताहर :
सिंहगड कॅम्पसमध्ये मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने दहशत माजवत पादचारी नागरिकांवर वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली. या टोळीकडून हल्ल्याचा थरार 28 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी दोन धाडसी अमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला पोलिसी खाक्या दाखवत अटक केले होते. याप्रकरणातील म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने बीडमधून अटक केली आहे.
करण अर्जुन दळवी (वय 21 रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके (वय 20, रा. सिंहगड रोड आंबेगाव बुद्रक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्थव हे 28 डिसेंबरला मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी करण आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड याने परिसरात कोयत्याने दहशत माजविली. हातातील कोयता हवेत फिरवून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून कोयता दुकानांच्या शटरवर मारून राडा घातला. आरोपींनी गाडय़ांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने लोकांनी दुकाने बंद करुन सैरावैरे धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी अर्थववर वार करून मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर कोयता फेकून मारला होता. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच सिंहगड ठाण्याच्या दोन अमलदारांनी धाव घेत सुजित गायकवाड याला ताब्यात घेत बेदम चोप दिला.
अधिक वाचा : अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
पोलीस आल्याचे पाहताच आरोपी करण पसार झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस त्याचा तपास घेत होते. तो बीडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांच्या पथकाने बीडमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.