मागील 95 वर्षांपासून सुरू आहे प्रयोग
सर्वसाधारपणे वैज्ञानिक जेव्हा एखादा प्रयोग करतात तेव्हा ते एखाद्या निष्कर्षावर पोहोचून तो लवकरात लवकर संपवू पाहतात. परंतु ऑस्ट्रेलियात एक प्रयोग सलग 95 वर्षांपासून सुरू आहे. हा जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, तसेच तो गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंद आहे. या प्रयोगाचे नाव ‘पिच ड्रॉप’ असून तो ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमधील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक थॉमस पर्नेल यांनी 1927 मध्ये सुरू केला होता. प्राध्यापक पर्नेल यांचे 1 सप्टेंबर 1948 रोजी निधन झाले होते. परंतु त्यांचा हा प्रयोग अद्याप सुरू आहे. या प्रयोगात तार पिच नावाच्या द्रवपदार्थाला एका प्लास्कमध्ये ठेवण्यात आले असून त्याचे थेंब कोसळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा अत्यंत चिकटून राहणारा द्रवपदार्थ असून तो दिसण्यास ठोस असतो, परंतु प्रत्यक्षात तो द्रवपदार्थ असतो. अखेर तार पिचचा एक थेंब कोसळण्यास किती वेळ लागतो हे जाणून घेण्याचा या प्रयोगामागील उद्देश होता. उपलब्ध माहितीनुसार 1927 पासून आतापर्यंत याचे केवळ 9 थेंब खाली पडले आहेत. परंतु कुणीच आजवर याचा एक थेंब प्लास्कमधून खाली पडताना पाहिलेला नाही. एकदा हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वेब कॅमेरा लावण्यात आला, परंतु अंतिम क्षणी कॅमेऱ्यात बिघाड झाला.तार पिचचा पहिला थेंब डिसेंबर 1938 मध्ये प्लास्कमधून खाली कोसळला होता. यानंतर फेब्रुवारी 1947 मध्ये दुसरा थेंब, एप्रिल 1954 मध्ये तिसरा थेंब, मे 1962 मध्ये चौथा थेंब, ऑगस्ट 1970 मध्ये पाचवा थेंब, एप्रिल 1979 मध्ये सहावा थेंब, जुलै 1988 मध्ये सातवा थेंब, नोव्हेंबर 2000 मध्ये आठवा थेंब आणि नववा थेंब एप्रिल 2014 मध्ये खाली पडला होता. सध्या प्लास्कमधील तार पिचद्वारे हा प्रयोग पूर्ण होण्यास अजून कमीत कमी 100 वर्षे लागू शकतात, असे मानले जात आहे.